दरेकरांच्या प्रतिमेस साताऱ्यात मारले जोडे; राष्ट्रवादी युवती सेलचे निषेध आंदोलन

    सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या प्रवेशावर भाजपचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर रंगलेला गालाचा मुका घेणारा पक्ष अशी टीप्पणी केल्याचे पडसाद साताऱ्यात उशीरा उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती सेलच्यावतीने सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस भवनासमोर प्रवीण दरेकर यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेवर शाई ओतून चप्पलने मारत निषेध नोंदवला.

    दरम्यान, दरेकर यांना जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी विरोधी पक्षनेते पद दिले आहे की, महिलांचा अपमान करण्यासाठी. आम्ही हा अपमान सहन करणार नाही, असा इशारा युवती सेलच्या प्रदेश सचिव स्मिता देशमुख यांनी यावेळी दिला.

    शिरुर येथे गेल्या चार दिवसांपूर्वी भाजपचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवती सेलच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस भवनासमोरच सोमवारी आंदोलन आयोजित केले. या आंदोलनाचे नेतृत्व युवती सेलच्या प्रदेश सचिव स्मिता देशमुख यांच्याकडे होते. तर यावेळी जिल्हाध्यक्षा पूजा काळे यांच्यासह युवती सेलच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

    यावेळी बोलताना स्मिता देशमुख म्हणाल्या, राष्ट्रवादी युवती सेलच्यावतीने प्रवीण दरेकरांचा आज आम्ही जाहीर निषेध करतो. ते एक विरोधी पक्षनेते आहेत. विरोधी पक्ष नेत्यांनी बेताल वक्तव्य करणे थांबवले पाहिजे. त्यांना जरा जाणीव असली पाहिजे. आपल्याला विरोधी पक्ष नेते सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी केले आहे. महिलांचा अपमान करण्यासाठी विरोधी पक्ष नेते पद दिलेले नाही. त्यांच्या गळय़ात आहे भाजपाची माळ आणि पायात चाळ आहे. ते कुठे जातात काय करतात हे जनतेला माहिती आहे. त्यामुळे महिलांविषयी बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादी युवती सेल जाहीर निषेध करत आहे.

    आम्ही साताऱ्यात प्रवीण दरेकरांना फिरकू देणार नाही. तुमची हिंमत असेल तर साताऱ्यात पाऊल ठेवून दाखवा. राष्ट्रवादी युवती काँग्रेस तुम्हाला चप्पलने मारायला कमी करणार नाही.