पुणे-बेंगलोर दरम्यान नवा एक्स्प्रेस महामार्ग उभारणार; नितीन गडकरी यांची घोषणा

  कराड : सातारा-सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांतील महापुरात पुणे-बेंगलोर महामार्ग ठिकठिकाणी पाण्याखाली आहे. त्यामुळे रस्ता खराब होऊन वाहतुकीची समस्या गंभीर होत आहे. परंतु, त्यामुळे या महामार्गाची दुरुस्ती करणार असून कसलाही पूर आला तरीही महामार्ग पाण्याखाली जाणार नाही, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिले. दरम्यान, पुणे-बेंगलोर दरम्यान 40 हजार कोटींचा नवा एक्सप्रेस महामार्ग बांधणार असल्याची घोषणाही गडकरी यावेळी केली.

  नितीन गडकरी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राष्ट्रीय महामार्ग, भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व कोनशिला अनावरण समारंभ कराड येथे संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते.

  यावेळी सहकार व पणनमंत्री तथा सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री सतेज पाटील, गृह शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, संजय मंडलिक, संजय पाटील, धैर्यशील माने, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले, मोहनराव कदम यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.

  नितीन गडकरी म्हणाले, सुरत, नाशिक, अहमदनगर, मार्गे तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा असा नवीन एक्सप्रेस महामार्ग बांधण्यात येणार आहे. तो पुणे-मुंबई एक्सप्रेसवे सारखा असेल. नागपूरसाठी मेट्रो ट्रेन सुरू करत आहोत. त्याच धर्तीवर पुणे ते कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, बारामती जेवढे ब्रॉडगेज आहेत. त्यावर आठ डब्ब्यांची मेट्रो चालू शकते. या मेट्रोचा वेग प्रती तास 140 किलोमीटर एवढा असेल. इकॉनॉमी क्लासचे चार डबे, विमानसेवेप्रमाणे दोन बिझनेस क्लासचे डबे असतील. याद्वारे मालवाहतूकही करण्यात येईल.

  तसेच स्थानिक बेरोजगारांनाही या माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल. या सेवेमुळे अंतर कमी वेळात पूर्ण होणार आहे.
  ते पुढे म्हणाले, देशातील पाणी नियोजन अत्यंत आवश्यक आहे. एकीकडे पूर तर एकिकडे पाणी टंचाई आहे. ही विषमता दूर करण्यासाठी वापर सुनियोजित व्हायला हवा, अशी अपेक्षा गडकरींनी व्यक्त केली.

  बाळासाहेब पाटील म्हणाले, रस्ते निर्मितीमुळे सातारा व पश्चिम महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांना चांगली सोय आहे. त्यामुळे आपल्या परिसरात रस्त्यांची कामे सुरू असताना त्यादृष्टीने सहकार्य करावे. रस्ते विकासामुळे विकासाची गती वाढेल. दळणवळणाच्या सुविधा सुलभ होतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने सर्व कामे वेळेत पूर्ण होतील, असा विश्वास व्यक्त करतानाच राज्य सरकारही या रस्त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन ना. पाटील यांनी दिले.
  दरम्यान, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार संजय (काका) पाटील यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

  कराडला नवीन उड्डाणपूल बांधणार

  कराड शहरातून पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वर्दळ आहे. परंतु, महामार्गावर शहराजवळ दुहेरी उड्डाणपूल नसल्याने वारंवार अपघात होत आहे. त्यामुळे याठिकाणी नवीन उड्डाणपूल बांधण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार कराडला नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

  बाळासाहेबांनी पुढाकार घ्यावा…

  राज्यात मंत्री असताना खंबाटकी घाटाचे काम करण्याची संधी मिळाली. बोगदा बांधण्यात आल्याचे गडकरी यांनी सांगितले. आता सातारा-पुणे दरम्यान दुसरा बोगदा बांधण्यात येत असून याठिकाणी शिवाजी पुतळा आणि दोन-चार गावांचा प्रश्न उद्भवत आहे. यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, असेही त्यांनी सांगितले.