
सातारा : सातारा पंचायत समितीच्या इतिहासात शिक्षण विभागात काम करत असताना सतत वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या विद्यमान गटशिक्षणधिकाऱ्यांनी शिवथर, ता. सातारा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला अचानक सकाळी ९.३० वाजता भेट दिली. वर्गामध्ये विद्यार्थी व शिक्षक उपस्थित नसल्याचे फोटो काढून, मोबाईलमध्ये शूटिंग करून चार दिवसांत खुलासे सादर करा, अन्यथा तुमच्या गैरहजेरीची नोंद मूळ सेवा पुस्तकात घेण्यात येईल, असे धमकीवजा नोटीस शाळा प्रशासनाला बजावल्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
मूळात शासनाने शिक्षकांनी शाळेत येण्याची वेळ ही १० वाजता निश्चित केली असताना सकाळी ९.३० वाजता शाळेत हजर राहून सातारच्या गटशिक्षणधिकाऱ्यांनी फुकटची फौजदारकी का केली? असा प्रश्न उपस्थित होत असून त्यांच्या या कारभाराच्या विरोधात साताऱ्यातील काही संघटनांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
याबाबत अधिक माहिती अशी की, शासनाने निर्बंध उठवल्यानंतर जिल्ह्यात १४ जूनपासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला. सातारा जिल्ह्यात ६९४३ शाळा असून, त्यापैकी २३६३ जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. १३८९ अनुदानित तर ३१९१ विना अनुदानित शाळा आहेत. शासनाने सकाळी १०.३० ते ५ या वेळेत शाळा सुरू ठेवण्यास परवानगी दिली असून, शाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच १०.१५ वाजता शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.
दरम्यान, १७ जून रोजी सातारचे गटशिक्षणाधिकारी सकाळी ९.३० वा. शिवथर, ता. सातारा येथील शाळेत दाखल झाले. शाळेमध्ये विद्यार्थी व शिक्षक उपस्थित नसल्याचे लक्षात येताच त्यांनी मोबाइलवर फोटो आणि व्हिडिओ काढून तो फोटो विस्तार अधिकाऱ्यांना पाठवून दिला. तसेच संबंधित शाळेत शिक्षक उपस्थित नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. एवढ्यावरच ते थांबले नसून त्यांनी शाळा प्रशासनाला एक नोटीस काढली असून, त्यामध्ये म्हटले की, १७ जून रोजी आपल्या शाळेत समक्ष भेट दिली असता, शाळा बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे माझे मुल माझी जबाबदारी या योजनेची व इयत्ता पहिलीच्या प्रवेशाची माहिती घ्यायची होती.
शासन निर्णयानुसार मुख्याध्यापक व इतर शिक्षकांनी ५० टक्के प्रमाणे शाळेमध्ये उपस्थित राहणे बंधनकारक आहे. शाळा बंद असल्याने माहिती घेता आली नाही. ही बाब प्रशासकीय दृष्ट्या गंभीर आहे. याबाबत शाळेतील शिक्षकांनी स्वतंत्र खुलासे पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे सादर करावेत. अन्यथा प्रशासकीय कारवाई प्रस्तावित निश्चित करून गैरहजर याची नोंद मूळ सेवा पुस्तकात घेण्यात येईल, असा धमकीवजा इशारा एका नोटिशीद्वारे दिल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.