वाल्मिकी मंदिर येथे निसर्ग केंद्रासाठी एक कोटी मंजूर

-खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून पर्यटकांसाठी साकारणार अध्ययन केंद्र

    कराड: पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्याची अनुभूती मिळण्यासाठी पाणेरी (ता.पाटण) येथील वाल्मिकी मंदीर परिसरात निसर्ग अध्ययन केंद्रासाठी खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून १ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. तशी माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. हे अध्ययन केंद्र पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार असून यामुळे स्थानिक पर्यटनाला चालना मिळणार आहे.

    ऐतिहासिक व धार्मिक महत्व असलेल्‍या वाल्मिक मंदीर परिसरात विपुल जंगल क्षेत्र आहे. तसेच हे धार्मिक व पर्यटन स्थळ असल्याने याठिकाणी भाविकांसह पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असतात. वाल्मिकी ऋृषींच्या वास्तव्याने पावन झालेला वाल्मीक मंदिर परिसर हा जंगलाने समृद्ध असून येथे विविध जातींचे प्राणी, पक्षी व झाडे आहेत. हा जैवविविधतेने नटलेला परिसर आहे. याशिवाय वाल्मिकी मंदिर डांबरी रस्त्याने जोडले गेले असल्यामुळे येथे वर्षभर पर्यटक येत असतात. मात्र या ठिकाणी अपेक्षित पर्यटन विकास झाला नसल्याने येथे येणा-या पर्टकांचा भ्रमनिरास होत आहे. आलेल्या पर्यटकांना निसर्गाची माहिती मिळावी याकरीता निसर्ग उद्यान केंद्राची नितांत गरज होती.

    निसर्गाच्या सानिध्यात राहून पशू, पक्षी, झाडे यांची माहिती पर्यटकांना व्हावी याकरीता पाणेरी येथे वाल्मीकी मंदिराजवळ निसर्ग केंद्र स्थापन करावे अशी मागणी खा. श्रीनिवास पाटील यांनी वनविभागाकडे केली होती. त्यांनी केलेली ही मागणी मंजूर झाली असून येथील निसर्ग अध्ययन केंद्रासाठी वनविभागाने १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

    निसर्ग उद्यान केंद्राच्या इमारतीमध्ये विविध पशू, पक्षी, झाडे यांच चित्रे, फोटो, त्यांची शास्त्रीय माहिती लावण्यात येणार आहे. पशु, पक्षांचा आवाज कसा असतो हे जाणून घेण्यासाठी त्यांचे रेकॉर्ड केलेल्या आवाजाची यंत्रे याठिकाणी बसविण्यात येणार आहेत. त्यातून लहान मुलांना एका छत्राखाली सर्व माहिती मिळून निसर्गाची ओळख व्हावी असा उद्देश आहे. तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची देखील संपूर्ण माहिती या केंद्रात दिली जाणार आहे. यासंदर्भातील चित्रफिती दाखवण्याची सुध्दा त्याठिकाणी व्यवस्था केली जाणार आहे. या केंद्राचे काम लवकर सुरु करण्यात यावे अशी सूचना खा.पाटील यांनी वन्यजीव प्रमुख दिलीप काकोडकर यांना केली आहे.