तीन महिन्यांपूर्वी दिला होता आदेश, पण अखेरच्या ३ तासांत अंमलबजावणी; पाटण येथील प्रकार

शासनाच्या शिक्षण विभागाने तीन महिन्यांपूर्वी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी तालुक्यातील शिक्षण विभाग ३-४ तास अगोदर जागा झाला आहे. शिक्षण विभागाच्या निष्काळजीपणामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

    पाटण : शासनाच्या शिक्षण विभागाने तीन महिन्यांपूर्वी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी तालुक्यातील शिक्षण विभाग ३-४ तास अगोदर जागा झाला आहे. शिक्षण विभागाच्या निष्काळजीपणामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

    विद्यार्थ्यांच्या या नुकसानीस बेजबाबदार असणाऱ्या आणि पालकांना नाहक त्रास देणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पालकांमधून होत आहे.

    पाटण तालुका शिक्षण विभागाला तीन महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज देण्यासाठी कळविण्यात आले होते. परंतु तालुक्यातील शिक्षकांनी याकडे दुर्लक्ष केले होते. शनिवारी (दि.१५) सकाळी पालकांना शिष्यवृत्ती अर्ज आज दुपारी ३ वाजेपर्यंत जमा करण्यासाठी शिक्षकांचे फोन आले. त्यानंतर पालकांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच अर्ज न देणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नसल्याचेही पालकांना शिक्षकांनी सांगितले.

    बेजबाबदार शिक्षकांवर कारवाईची मागणी

    शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला बंधनकारक आहे. तलाठ्यांकडून कच्चा दाखला घेऊन तो तहसीलदार कार्यालयातून पक्का करून घ्यावा लागतो. त्यासाठी सुमारे १५ दिवसांचा कालावधी जातो. अशावेळी शिक्षण विभागाच्या या निष्काळजीपणाचा फटाका विद्यार्थ्यांना बसणार आहे. हा तालुका डोंगरदऱ्यात वसलेला आहे. येथे येण्यासाठी सध्या वाहनांची योग्य सोय नाही. त्यामुळे तालुक्यातील या बेजबाबदार शिक्षक, कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.