राजकीय आयुधे बाजूला ठेवून मैदानात यायचे धाडस दाखवा; आमदार गोरेंचे रामराजेंना आव्हान

    खटाव : गेल्या १५ वर्षांत जंग-जंग पछाडूनही तुम्हाला माण-खटावमधील वाऱ्याची दिशा समजली नाही. महाराज, तुम्ही जेव्हा-जेव्हा माणमध्ये आला तेव्हा-तेव्हा तुमचा पक्ष आणि तुमचे बगलबबचे निवडणुका हरल्याचा इतिहास तुमच्या नावे झाला आहे. तुमचे अतिक्रमण इथल्या स्वाभिमानी जनतेने नेहमीच हाणून पाडले आहे.

    आजपर्यंत तुम्ही पालकमंत्री, विधानपरिषद सभापतिपदाची आयुधे घेऊन माणमध्ये आलात. आताही सगळी राजकीय आयुधे बाजूला ठेवून मैदानात यायचे धाडस दाखवा असे खुले आव्हान आमदार जयकुमार गोरे यांनी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना दिले. माण – खटावमध्ये वाऱ्याची दिशा शोधणाऱ्या तुमच्या होकायंत्राला आमच्या शुभेच्छाच आहेत. मात्र, आग लावून कांड्या पिकवायचे धंदे आता बंद करा, असा टोलाही त्यांनी लगावला.

    माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ना. रामराजे यांच्या उपस्थितीत नुकतीच संवाद सभा झाली. त्यावेळी बोलताना रामराजेंनी माणमधील वाऱ्याचा अंदाज घ्यायला आलोय, कार्यकर्त्यांना मान खाली घालावी लागेल, अशी तडजोड होणार नाही अशी वक्तव्ये केली होती. जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्या वक्तव्यांचा चांगलाच समाचार घेतला.

    जयकुमार गोरे म्हणाले, मी राजकारणात आल्यापासून गेल्या १५ वर्षांत राजेंना माणमधील वाऱ्याची दिशा समजली नाही. ते जेव्हा-जेव्हा इथे आले तेव्हा-तेव्हा राष्ट्रवादी निवडणुकांमध्ये पराजीत झाली. राजेंचे अतिक्रमण इथल्या जनतेने प्रत्येकवेळी हाणून पाडले. आपण माण-खटावमध्ये बिन बुलाये महेमान असता. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्या येण्याने नाखूश असतात. आपला पायगुण चांगला नसल्याचे कार्यकर्त्यांना माहित आहे. त्यामुळे जबरदस्तीने त्यांच्यावर नेतृत्व लादायच्या भानगडीत पडू नका. आमचे म्हणणे खरे आहे की नाही हे एकदा तपासून पाहा.