सडानिनाईच्या जांभा वीट फॅक्टरीवर पाटण वन विभागाची कारवाई; तीन वाहने जप्त

पाटण तालुक्यातील सडानिनाई भागात वनविभागाच्या हद्दीत सुरू असलेल्या जांभा वीट फॅक्टरीवर पाटणच्या वनविभागाने कारवाई केली. या कारवाईत दोन मिनी ट्रक, एक ट्रॅक्टर ट्रॉलीसह जांभा दगड जप्त करण्यात आला. या प्रकरणी भरत घोंडीबा झोरे असे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे नाव आहे.

    कराड : पाटण तालुक्यातील सडानिनाई भागात वनविभागाच्या हद्दीत सुरू असलेल्या जांभा वीट फॅक्टरीवर पाटणच्या वनविभागाने कारवाई केली. या कारवाईत दोन मिनी ट्रक, एक ट्रॅक्टर ट्रॉलीसह जांभा दगड जप्त करण्यात आला. या प्रकरणी भरत घोंडीबा झोरे असे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे नाव आहे.

    याबाबत पाटण वनविभागाने दिलेली माहिती अशी, २६ फेब्रुवारी २०२२ रोजी वनपाल ढोरोशी व वनरक्षक धायटी हे वन व वनहद्दीची फिरती करत असताना मौजे सडानिनाई भागात भरत धोंडिबा झोरे यांच्या जांभा दगड चिरे खाणीची तपासणी केली. या खाणीचा बराच भाग वन विभागाच्या हद्दीत असल्याचे दिसून आले. तसेच वनहद्दीच्या आत ४ बाय ४ मीटर आकाराचे दगडी चिऱ्यांचे घर मिळून आले. त्यामुळे वनरक्षक धायटी यांनी गुन्हा दाखल केला. तसेच खाणीतील खोदकाम बंद करण्याच्या सूचना झोरे यांना दिल्या.

    त्यानंतर ११ मार्च रोजी साताराचे सहाय्यक वनसंरक्षक महेश झांझुर्णे, पाटणचे वनपरिक्षेत्र अधिकारी एल. व्ही. पोतदार, वन परिमंडळ अधिकारी ए. के. राऊत, धायटीचे वनरक्षक आर. ए. कदम आदींनी राऊंड स्टाफ यांच्यासह सडानिनाई येथे भरत धोंडिबा झोरे यांच्या खाणीची तपासणी केली. खाण बंद न करता तेथील मिनी ट्रक दोन व एका ट्रॅक्टर ट्रॉलीसह जांभा दगड चिरे भरून वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. त्यानुसार वरील तिन्ही वाहने वनविभागाने जप्त केली आहेत. भारतीय वन अधिनियम १९२७ नुसार झोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    वन हद्दीतील अतिक्रमणे हटवली

    वन जमिनीवर अतिक्रमण करून तात्पुरत्या स्वरूपात मजुरांसाठी बांधलेली निवारा खोली पाडून अतिक्रमण नष्ट करण्यात आली. खोदकाम साहित्य सील करून खाणीचे कामही बंद करण्यात आले आहे.