एक व्हाॅट्सऍप ग्रुप असाही…; थकित कर होतोय वसूल

व्हाॅट्सऍप ग्रुप (WhatsApp Group) हे फक्त, चॅटिंग करणे, वाढदिवसाला शुभेच्छा देणे कुणीतरी टिंगलटवाळी करणे यासाठी मर्यादित नसतात. त्याचा उपयोग चांगल्याही गोष्टींसाठी होऊ शकतो. प्रत्येक गावात व्हाॅट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत सामाजिक कामे करणारे अनेक विविध ग्रुप असल्याचे पाहायला मिळतात.

    सातारा : व्हाॅट्सऍप ग्रुप (WhatsApp Group) हे फक्त, चॅटिंग करणे, वाढदिवसाला शुभेच्छा देणे कुणीतरी टिंगलटवाळी करणे यासाठी मर्यादित नसतात. त्याचा उपयोग चांगल्याही गोष्टींसाठी होऊ शकतो. प्रत्येक गावात व्हाॅट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत सामाजिक कामे करणारे अनेक विविध ग्रुप असल्याचे पाहायला मिळतात. असाच ‘आम्ही वावरहिरेकर’ मंडळीचा व्हाॅट्सऍप ग्रुप आहे. या ग्रुपवर नेहमीच गावहितासाठी चर्चा पाहायला मिळते. यात अनेक तरुण, ज्येष्ठ मंडळी, शिक्षक, सैनिक, पोलिस, शेतकरी विद्यार्थी, गावातील प्रतिष्ठित लोकांचा सहभाग आहे.

    या ग्रुपवर नेहमी विधायक तर कधी वादग्रस्त चर्चा पहायला मिळते. ठराविक जण यात सहभाग नोंदवतात. तर काहीजण मात्र गप्प बसतात. ग्रुपवर नेहमी ग्रामपंचायतकडून मिळणार्‍या अपुर्‍या सुविधांचा पाऊस पडतो. ग्रामपंचायत सुविधा मागता, मग आपला नियमित कर का भरत नाही? येथील ग्रामपंचायत थकित कर २९ लाखांच्या घरात असल्याने नागरिकांना सुविधा पुरवण्यास अडचण येत असल्याचे नवनिर्वाचित सदस्य दत्तात्रय भोसले यांनी या ग्रुपच्या माध्यमातून थकित कर भरण्यासंबंधीचा एक व्हिडिओ शेअर केला. यास गावातील नोकरी, व्यवसायानिमित्त परगावी असणार्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ऑनलाईनद्वारे आपली थकीत असणारा कर जमा करण्यास सुरुवात केली. कर भरलेल्याची पावती ग्रुपवर टाकत अभिनंदन होत आहे.