ठाकरे सरकारचा दुटप्पीपणा जनतेने ओळखला : विक्रम पावसकर

    सातारा : एकीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील आंदोलनांना पाठिंबा द्यायचा व दुसरीकडे राज्यातील शेतकऱ्यांची वीज तोडायची, हा महावसुली ठाकरे सरकारचा दुटप्पीपणा जनतेने आता ओळखला आहे. तो त्वरित थांबविला नाही तर जनतेच्या रोषास सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा इशारा देत भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी दिला.

    पावसकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात, राज्यातील सरकारी कार्यालये, ग्रामपंचायती, पाणीपुरवठा योजना, मंत्र्यांचे बंगले, साखर कारखाने, खाजगी फार्म हाऊसमधील वीजबिलांच्या थकबाकीने उच्चांक गाठला असताना त्याकडे दुर्लक्ष करून दुष्काळ, अतिवृष्टी, कोरोनाकाळातील टाळेबंदीमुळे अगोदरच कंबरडे मोडलेल्या शेतकरी व गरीब कुटुंबांची ठाकरे सरकारने फसवणूक केली आहे. धनिक थकबाकीदारांसाठी ‘अभय योजना’ राबविणाऱ्या आघाडी सरकारने गरीब शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले, असा आरोपही केला.

    दुष्काळ, अतिवृष्टी, वादळांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी हवालदील झाला आहे, तर कोरोनाकाळातील टाळेबंदीमुळे सामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मार्च महिन्यात विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारला जाब विचारल्यानंतर कृषीपंप आणि घरगुती ग्राहकांच्या वीज तोडणीची कारवाई थांबविण्याचे आश्वासन देण्यात आले. पण अधिवेशनानंतर पुन्हा वीजतोडणीची कारवाई सुरू करून सरकारने सामान्य जनतेचा विश्वासघात केला, अशी टीकाही पावसकर यांनी केली.