ढेबेवाडी पोलिसांनी लावला 12 तासात चोरीचा छडा; दोघे अटकेत, एक फरार

  कराड : करपेवाडी, ता.पाटण येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ऑफिसचे कुलूप बनावट चावीने उघडून सुमारे सव्वा लाख रुपयांचा ऐवज अज्ञाताने चोरल्याची घटना घडली होती. चोरी उघडकीस आल्यानंतर ढेबेवाडी पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे गतीमान करत अवघ्या 12 तासात चोरीचा छडा लावला. मुद्देमालासह दोघा संशयितांना अटक केली आहे.

  ऋषीकेश वंसत कदम (वय 23) रा. गुढे, ता. पाटण, रोहित मारुती जाधव (वय 22) रा. तळमावले, ता. पाटण अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. राज विजय करपे रा. करपेचाळ-तळमावले याचा शोध सुरू आहे.

  पोलिसांनी दिलेली माहिती अशी, करपेवाडी, ता. पाटण येथे महेश कोकाटे यांचे नवीन इमारतीमध्ये ऑफिस आहे. ऑफिसमध्ये त्यांनी पॉलीकॅब कंपनीचे वायरचे बंडल ठेवले होते. 16 ते 17 सप्टेंबरदरम्यान अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीने ऑफिस उघडून ऑफिस मधील 1 लाख 19 हजार रुपये किंमतीचे पॉलीकॅब कंपनीचे वायरचे 31 बंडल चोरून नेले. ही घटना उघडकीस येताच फिर्यादीने ढेबेवाडी पोलिसात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत 12 तासाच्या आतच या चोरीचा छडा लावत ऋषीकेश कदम व रोहित जाधव या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर चोरीतील तिसरा संशयित राज करपे याचा शोध सुरू आहे.

  गुन्हेगारी होतीये कमी

  सदर गुन्हा उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित पाटील, ढेबेवाडी पोलिस स्टेशनचे सपोनि संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय तलबार, पो.हवा. राजेंद्र घाडगे, शशिकांत खराडे, नवनाथ कुंभार यांनी उघडकीस आणला आहे.

  गुन्हा घडूच नये व जर घडला तर त्याचा त्वरित निपटारा करून गुन्हेगार व गुन्हेगारीला आळा घालणे यावर आमचा भर आहे. ढेबेवाडी पोलिस स्टेशन हद्दीत गुन्ह्यांचे प्रमाण कमी होत आहे. ढेबेवाडी, पाटण घाटातील जबरी चोरी, मत्रेवाडी येथील खून अथवा गुढे येथे भांडणात अवैद्य पिस्तुल हस्तगत करणे, अशा अनेक गुन्ह्याची उकल आम्ही अवघ्या काही तासात केली आहे.

  – संतोष पवार, सहय्यक पोलीस निरीक्षक, ढेबेवाडी.