राजे मैदानात उतरल्याने राजकारण तापले ; बॅनरबाजीच्या निमित्ताने साताऱ्यात भाऊ बंदकीचे नाट्य

आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा बालेकिल्ला असणाऱ्या परळीला राष्ट्रवादीने शाशिकात वायकर यांच्या रुपाने खिंडार पाडल्याने सुरुचीत अस्वस्थता वाढली आहे . साताऱ्यात आमदार शशिकांत शिंदे यांचा वाढता वावर त्यानिमित्ताने सुरु झालेली राजकीय बांधणी ही दोन्ही राजेना साताऱ्यात धोक्याची घंटा आहे . मात्र साताऱ्यात रंगलेल्या बॅनर बाजी मुळे दोन्ही राजे एकत्र येतील याची सुतराम शक्यता नाही त्यामुळे याचाच फायदा घेण्याचे राष्ट्रवादीचे धोरण असू शकते

  सातारा : साताऱ्याच्या दोन राजेशाही सत्ता केंद्रात पुन्हा आरोप प्रत्यारोपाचे शीतयुद्ध सुरु झाल्याने शहराचे राजकारण ढवळले गेले आहे . विकास कामांच्या आडोशाने एकमेकांना राजकीय लक्ष्य करण्याची अहमहमिका सुरु झाल्याने सुरुची व जलमंदिर या दोन सत्ता भाऊ बंदकीच्या राजकारणाचा नवा अंक आगामी पालिका निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय पटलावर रंगण्यास सुरवात झाली आहे .

  सातारा जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्र सिंहराजे भोसले यांच्या मनोमिलनाची आजही वाळवंटातील एखाद्या सुखद हिरवळीप्रमाणे आठवण निघते . सुमारे दशकभराच्या मनोमिलनाला पाच वर्षापूर्वी खासदार उदयनराजे यांनी तिलांजली देत सामान्य घरातील गृहिणी असणाऱ्या माधवी कदम यांना नगराध्यक्ष पदी निवडून आणले . पालिका निवडणुकीत माधवी कदम यांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्या पत्नी वेदांतिकाराजे भोसले यांचा पराभव केला . या निवडणुकीत आमदारांच्या नगर विकास आघाडीला बारा जागांमुळे पालिकेत विरोधकांच्या भूमिकेत रहावे लागले . राजघराण्यातील दोन सत्ताकेंद्राचे आंतर विरोध ताणले जाण्याचे वहिनी साहेबांचा झालेला पराभव हेच मूळ कारण आहे . हा विरोध धीरोदात्तपणे पचवत शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा तालुक्याच्या राजकारणावर आपली पकड अधिक आक्रमकपणे मजबूत केली . मात्र त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपचा रस्ता पकडला . दरम्यान भाजपच्या लाटेवर स्वतः उदयनराजे यांनी स्वार होत राज्यसभेची खासदारकी मिळविलीच . मात्र सुरुची राडा आणि सदाशिव पेठेतील जागा हस्तांतरणावरून रंगलेल्या राजकीय टशनने साताऱ्यात दोन्ही भावांमधील ताणल्या गेलेल्या संबंधांची जोरदार चर्चा झाली . यामध्ये दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना कायद्याच्या मांडवाखालून जाताना बराच मनःस्ताप सहन करावा लागला . या राजकारणाचा पुढील अंक साताऱ्यात रंगलेल्या बॅनरबाजी वरून पहायला मिळाला . पोवई नाका ते वाढे फाटा या रस्त्याच्या विकास कामावरून दोन्ही गटांनी एकमेकांना शेलक्या शब्दात चिमटे काढले , खासदार व आमदारांनी एकमेकांवर अप्रत्यक्षपणे तोंडसुख घेत पालिका निवडणुक जवळ आल्याची सातारकरांना आठवणं करून दिली . मनोमिलनाच्या काळात कायदा सुव्यवस्था सुशेगाद होती , मी मी म्हणणारे कार्यकर्ते दोन्ही सत्ताकेंद्राच्या आडोशाने निर्धास्त होते . पण पाच वर्षात सातारा विकास आघाडीने बहुमताच्या बळावर केलेल्या कारभारातील त्रुटींचा राजकीय फायदा आमदार गटाला घेताच आला नाही . साताऱ्यात पोवई नाक्यावर अत्यंत आक्रमकपणे बॅनरबाजी रंगल्याने पोलीस प्रशासनाचीही यापुढील काळात कसोटी लागणार आहे . सध्या उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे दोघेही भाजपमध्ये जरी असले तरी त्यांचा तेथेही समांतर राजकीय प्रवास सुरु असल्याने भाजपला साताऱ्यात ही ताकत एकत्रितपणे वापरता येईनाशी झाली आहे .

  जिल्हा बॅकेची समीकरणे ठरणार निर्णायक

  सातारा जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीची पकड असली तरी बॅकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपचे आमदार आहेत . नागरी बॅका व सेवा सोसायट्यांच्या राजकारणावर त्यांची मजबूत पकड असल्याने त्यांना सोबत घेऊनच पुढे जाण्याची राष्ट्रवादीची रणनीती आहे . विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी असणारे सख्य व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी असणारी विशेष जवळीक यामुळे भाजपचे म्हणवले जाणारे शिवेंद्रसिंह राजे राष्ट्रवादी च्या गोतावळ्यात च रमले आहेत . खासदार उदयनराजे भोसले यांच्या गृहनिर्माण मतदार संघातील अडचणी वाढविण्याच्या राष्ट्रवादी च्या सुप्त रणनीती आहेत . मात्र खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांचे ठराव विभागीय सहनिबध कांनी कायम ठेवल्याने राष्ट्रवादीला सेटबॅक बसला आहे . बॅकेच्या आखाड्यात उदयनराजेना घेण्यास स्वतः पालकमंत्री बाळासाहेब पाटील फारसे अनुकुल नसल्याची चर्चा असून बॅकेच्या राजकारणातील या हालचालींचे पडसाद पालिका निवडणुकांमध्ये उठणार आहेत . यामध्ये आमदार शिवेंद्रसिंह राजे यांची भूमिका अत्यंत महत्वाची असणार आहे . बाबाराजेंचा आक्रमकपणा खासदारांना अडचणीत आणू शकतो कारण त्यांचे राष्ट्रवादी कनेक्शन आगामी राजकारणाचा हाय व्होल्टेज ड्रामा रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही .

  बाबा राजेच्या परळीचा राष्ट्रवादी बाणा

  आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा बालेकिल्ला असणाऱ्या परळीला राष्ट्रवादीने शाशिकात वायकर यांच्या रुपाने खिंडार पाडल्याने सुरुचीत अस्वस्थता वाढली आहे . साताऱ्यात आमदार शशिकांत शिंदे यांचा वाढता वावर त्यानिमित्ताने सुरु झालेली राजकीय बांधणी ही दोन्ही राजेना साताऱ्यात धोक्याची घंटा आहे . मात्र साताऱ्यात रंगलेल्या बॅनर बाजी मुळे दोन्ही राजे एकत्र येतील याची सुतराम शक्यता नाही त्यामुळे याचाच फायदा घेण्याचे राष्ट्रवादीचे धोरण असू शकते . दोन्ही गटातील नाराजांना चुचकारण्याचे काम आमदार शशिकात शिंदे यांनी पद्धतशीरपणे सुरु केले आहे . काही इच्छुकांनी तर प्रत्यक्ष गाठी भेटीची काही सत्र उरकली आहेत . शहराच्या पश्चिम भागातील राष्ट्रवादीचे काही सदस्य आपल्या गटात ओढण्यासाठी आमदार व खासदार गटाने जोरात फील्डिग लावली आहे .उदयनराजे यांच्या किचन कॅबिनेटवर राजकीय वर्तुळातच नव्हे तर सामान्यांमध्ये सुद्धा तीव्र नाराजी आहे . आणि विरोधी गट म्हणून सक्षम पर्याय देण्यास आमदारांची नगर विकास आघाडी अपेक्षित भूमिका गेल्या पाच वर्षात घेऊ शकलेली नाही . त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत कोण ते राजकीय चित्र असेल याची संभाव्य कल्पना वॉर्ड आरक्षणानंतरच येणार आहे .