तुरुंगातूनदेखील प्रभाकर घार्गेंची डरकाळी ! विजयाचा चौकार ; जिल्हा बँकेचा गड राखला.

राष्ट्रवादीला मोठा धक्का. तालुक्यात पक्ष बांधणीचे आव्हान

  फिरोज मुलाणी, औंध : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पहिल्या दिवसापासून निरनिराळी वळणे घेणाऱ्या खटाव तालुक्यातील मतदारांनी स्वाभिमान दाखवित माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तुरुंगात असताना देखील घार्गेंनी डरकाळी फोडत टायगर जिंदा है दाखवून दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आव्हान मोडीत काढून विजयी चौकार मारला. घार्गेच्या विजयाने खटावचे राजकारण आता नवीन वळणावर जाऊन पोहचले आहे.

  खटाव तालुक्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा बँक, मार्केट कमेटी आदी संत्ताकेंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असले तरी पक्षात माजी आमदार प्रभाकर घार्गे आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवीनी पंतप्रतिनिधी यांच्या दोन गटात सुप्त संघर्ष सुरुच होता. दोन गटात सातत्याने शह काटशहाचे राजकारण घडत होते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दोन गटातील संघर्ष उफाळून आला. एकेकाळी घार्गे यांचे निकटवर्तीय असलेल्या नंदकुमार मोरे यांना गायत्रीदेवीनी यांनी आपल्या गटात खेचले. जिल्हा बँकेतील भाकरी फिरवण्याचा निर्णय घेत नंदकुमार मोरे हा नवीन चेहरा बँकेच्या आखाड्यात उतरवीत घार्गेंच्या उमेदवारीचा पत्ता कापून घार्गेंना धक्का दिला. पडळ कारखान्यातील घटनेमुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या घार्गेची कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने व्युव्हरचना आखली. सातारा येथून घार्गेंना कंळबा जेलमध्ये हलवीत त्यांच्या वरील दबाव वाढवला. त्यातच जिल्ह्यातील वरीष्ठांनी महिला मतदारसंघाचे गाजर दाखवून या मतदारसंघात तडजोड करून नंदकुमार यांचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न असफल ठरला. न्यायालयाने घार्गे यांना निवडणूक लढवण्याची परवानगी दिल्याने घार्गे गटाने बंडखोरीचा झेंडा हाती घेत राष्ट्रवादीचा दबाव झुगारून टाकला. अर्ज माघारी घेण्याच्या सुरवातीला इंदिरा घार्गे यांनी महिला मतदारसंघातील उमेदवारी अर्ज माघारी घेऊन सोसायटी मतदारसंघात निवडणूक लढण्याचे संकेत देऊन मतदारातील संभ्रम दूर केला. हरणाई सुतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख आणि माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर यांनी घार्गे तुरुंगात असले तरी त्यांच्या पत्नी इंदिरा घार्गे यांच्या बरोबर ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. आमच ठरलय टिमचे शिलेदार रणजिसिंह देशमुख, डॉ दिलीपराव येळगावकर यांच्या भूमिकेने घार्गेच्या उमेदवारीला बळ मिळाले. इंदिरा घार्गे आणि प्रिती घार्गे यांनी मतदारसंघ पिंजून काढीत मतदारापुढे राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेल्या अन्यायाचा पाढा वाचीत मतदारांची सहानुभूती मिळवण्यात त्या यशस्वी ठरल्या. मतदारावरील वाढता दबाव लक्षात घेऊन वेळेवर मतदार ताब्यात घेऊन सहलीवर पाठवीत निवडणुकीत आघाडी घेतली ही आघाडीच त्यांना विजयापर्यंत घेऊन गेली. निवडणुकीत भाजपचे तालुकाध्यक्ष धनाजी चव्हाण यांनी अर्ज माघारी घेऊन आ. जयकुमार गोरे यांच्या इशाऱ्यावर घार्गे यांच्या तंबूत डेरेदाखल झाले. त्यामुळे घार्गे गटाची ताकद वाढली होती. शेवटच्या टप्प्यापर्यंत गाफील न राहता रणजितसिंह देशमुख, डॉ दिलीप येळगावकर इंदिरा घार्गे यांनी खिंड लढवून विजयाचा गड सर केला. तर मतदाना दिवशी घार्गे मतदानकेंद्रावर उपस्थित राहिल्याने कार्यकर्त्यांच्या अंगात उत्साह संचारला होता. अडचणीत सामना करीत दोन वर्षापूर्वी ठराव करताना घार्गेनी केलेले नियोजन प्रत्यक्ष मैदानावर उपस्थित नसताना देखील कामाला आल्याने बँकेचा गड त्यांना राखता आला. बँक निवडणुकीत कागदावर राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत दिसत असली तरी घार्गे यांच्या वरील प्रेम का पक्षनिष्ठा अशा द्विधा मनस्थितीतून मतदारांना तंबूत आणण्यात नंदकुमार मोरे आणि राष्ट्रवादी कमी पडली. पक्षनिष्ठा असल्याने मतदार जाणार नाहीत हा गाफिलपणा देखील मोरेच्या पराभवाला कारणीभूत ठरला. मतदारांना सहलीवर पाठवण्यात त्यांना उशीर झाला होता. गायत्रीदेवीनी नंदकुमार मोरे यांच्या करीता वरीष्ठ स्तरावरून सर्व डावपेच वापरले मात्र मैदानात प्रमुख नेतेमंडळी त्यांच्या सोबत नसल्याने राणीला डाव जिंकता आला नाही . प्रमुखांनी ताकदच लावली नसल्याने निवडणूक राष्ट्रवादीच्या हातातून गेली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संघर्षाची ठिणगी पडली आहे. निवडणुकीत घार्गे गट काँग्रेस, भाजप, शिवसेना असे सगळे विरोधक राष्ट्रवादीला पुढील काळात घेरण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत एकत्र येण्याची चर्चा तालुक्यात सुरू असल्याने खटावचे राजकारण आता नवीन राजकीय वळणावर जाऊन पोहचले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या अन्यायाचा वचपा काढण्यासाठी घार्गे गट पेटून उठला आहे. त्यामुळे यापुढे राष्ट्रवादी विरुद्ध सगळे असा संघर्ष तालुक्यात अटळ असल्याचे मानले जात आहे

  माय लेकींनी पदर खोचला
  गेल्या सहा महिन्यापासून संकटाची मालिका सातत्याने समोर उभी रहात असल्याने घार्गे कुटुंब खचले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील उमेदवारी बदलून घार्गेंची कोंडी करून दबाव टाकला होता. मात्र संकटाच्या काळात रडायच नाही लढायच ही भूमिका घेत घार्गे यांच्या पत्नी इंदिरा आणि कन्या प्रिती यांनी कंबर कसली. राष्ट्रवादी काँग्रेसचा दबाव झुगारून तोडीस तोड यंत्रणा उभी करुन सर्वांना बरोबर घेऊन एक ऐतिहासिक विजय साकार केला

  नंदकुमार मोरेंची चिकाटी
  जिल्हा बँकेत नंदकुमार मोरे यांना पराभव पत्करावा लागला असला तरी त्यांनी सुरवातीपासून चिकाटी सोडली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मतदारापुढे मांडून एका एका मताची बेरीज करीत मताचा आकडा तब्बल 46 मतावर नेहला. त्यांनी घेतलेल्या लक्षणीय मताच्या संख्येचा विरोधी गटाने बारकाईने विचार करणे गरजेचे आहे.

  जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गायत्रीदेवीनी पंतप्रतिनिधी यांनी माझ्यावर विश्वास टाकला होता. निवडणूक हातात असताना देखील पक्षातील प्रमुखांनी ऐनवेळी फंदफितुरी केल्यामुळेच आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले. लोकांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांला जे प्रेम दिले ते विसरू शकत नाही. पुढील काळात कार्यकर्ते आणि गायत्रीदेवी यांच्याशी चर्चा करून तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे काम नेटाने करणार आहे.

  नंदकुमार मोरे, उमेदवार सहकार पँनेल खटाव

  गोरे ठरले चाणक्य
  जिल्हा बँकेच्या निवडणूकीत आ. जयकुमार गोरे यांनी अतिशय सावध पवित्रा घेऊन निवडणुकीच्या आखाड्यात डावपेच टाकले. खटावमध्ये अडचणीत असलेल्या घार्गेना पाठबळ देऊन घार्गे कुटुंबाची सहानुभूती मिळवली आणि माण मध्ये मनोज पोळना पाठिंबा देऊन राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या अडचणी वाढवून ठेवीत एकाच दगडात दोन पक्षी मारून विधानसभा निवडणुकीचा रस्ता सरळ करून घेतला. शिवाय आमच ठरलय टिमचा इस्कोट करण्यात देखील ते यशस्वी चाणक्य ठरले.