संरक्षण कुटी गेट बंद करत प्रकल्पग्रस्तांकडून शासनाचा निषेध; ग्रामस्थांचे गेटसमोर असहकार आंदोलन सुरू

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत पाटण तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ ठिकाणी वसलेल्या आणि चांदोली अभयारण्याच्या गाभा क्षेत्रात येणाऱ्या मळे, कोळणे व पाथरपुंज या तिन्ही गावांचे पुनर्वसन तातडीने व्हावे. तसेच इतर मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने तिन्ही गावातील नागरिकांनी मंगळवारपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे.

  पाटण / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत पाटण तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ ठिकाणी वसलेल्या आणि चांदोली अभयारण्याच्या गाभा क्षेत्रात येणाऱ्या मळे, कोळणे व पाथरपुंज या तिन्ही गावांचे पुनर्वसन तातडीने व्हावे. तसेच इतर मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने तिन्ही गावातील नागरिकांनी मंगळवारपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनस्थळी कोणत्याच विभागाचा अधिकारी सायंकाळी चारपर्यंत फिरकला नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी कोळणे येथील वनविभागाच्या संरक्षण कुटीसह गेट बंद करून शासनाच्या दिरंगाईचा निषेध व्यक्त करून ठिय्या मांडला आहे.

  ३६ वर्षांपासून पुनर्वसन रखडले

  यावेळी बोलताना समन्वयक संजय पवार म्हणाले, गेल्या सुमारे ३६ वर्षांपासून मळे, कोळणे पाथरपुंज या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न शासन दरबारी रखडला आहे. पुनर्वसन नाहीच पण १८ नागरी सुविधाही आम्हाला मिळाल्या नाहीत. शासनाची कोणतीच सुविधा मिळत नसल्याने येथील ग्रामस्थांची अवस्था जनावरांसारखी आहे. गेल्या वर्षी २५ जानेवारी रोजी आंदोलन केले, त्यावेळी शासनाचे अनेक अधिकारी आले आणि आश्वासन देऊन निघून गेले. मात्र, त्या आश्वासनांची कोणतीच पूर्तता झाली नाही. आमच्या अडचणी समजून घ्याव्यात. पुर्नवसन होत नसेल तर आम्हाला हा प्रकल्पच नको. १९८६ पासून आम्ही पुनर्वसनाची वाट पाहतोय. कमीत कमी १८ नागरी सुविधा तरी पुरवाव्यात, मगच आंदोलन थांबवण्यास यावे, असेही ते म्हणाले.

  वनविभागासोबत संघर्ष अटळ

  संजय कांबळे म्हणाले, सकाळपासून अधिकाऱ्यांची वाट पाहिली ते आलेच नाहीत. ठोस निर्णय होईल असे वाटले होते. मात्र, तसे झाले नाही. प्रशासन आणि वनविभागाला यापुढे आम्ही कोणतेही सहकार्य करणार नाही. आमचे शंभर टक्के पुनर्वसन झालेच पाहिजे. येथील ग्रामस्थांचे जीवन अंधःकारमय झाले असून आम्हाला आता रोखण्याचा प्रयत्न करू नये. यापुढे वनविभाग व आमचा संघर्ष अटळ आहे. वनविभाग व व पुनर्वसन विभागाची यंत्रणा याला जबाबदार राहील.

  या आंदोलनात पुनर्वसन कृती संघर्ष समितीचे समन्वयक संजय कांबळे, दीपक कांबळे (सर), संजय पवार, भरत चाळके, शिवाजी चाळके यांच्यासह मळे, कोळणे, पाथरपुंज गावातील ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. आंदोलन स्थळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी कोयनानगरचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  आम्ही माणसं हाय, आम्हाला न्याय द्या…

  स्थानिक लोकप्रतिनिधींनी चांदोली अभयारण्याला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या, अशी मागणी केली. याचा अभिमान आहे. मात्र, जंगलाला नाव देण्यापेक्षा आम्ही लोकप्रतिनिधींना विनंती करतो की आम्हीही माणसं हाय, आम्हाला कुठे तरी न्याय द्या. आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करा.

  – संजय पवार, समन्वयक, संघर्ष समिती.