निपाहाच्या अहवालाने महाबळेश्वरमध्ये खळबळ; उलट-सुलट चर्चेने संभ्रम

  महाबळेश्वर : महाबळेश्वरच्या एका गुहेतील वटवाघळांमध्ये निपाह रोगाच्या अॅन्टिबाॅडीज आढळल्याचा अहवाल प्रसिध्द होताच महाराष्ट्रात एकच खळबळ माजली आहे. निपाह व्हायरसचा आधार घेऊन महाबळेश्वरच्या बाबतीत उलट सुलट चर्चा हाेत असल्याने पर्यटनावर परिणाम होण्याची भिती महाबळेश्वरकर व्यक्त करीत आहेत. दरम्यान महाबळेश्वर तालुक्यातील एकाही व्यक्तीला निपाहची लागण झाली नाही. कोणतीही लक्षणे असलेला रूग्णही आढळला नाही, अशी माहिती महाबळेश्वरच्या तहसिलदार सुषमा चैधरी पाटील यांनी दिली

  अहवालामुळे महाराष्ट्रात खळबळ

  महाबळेश्वरपासून दहा ते बारा किमी अंतरावर असलेल्या मालुसारवाडी या गावाजवळ घनदाट जंगलात असलेल्या राॅबर्सकेव्ह या गुहेत गेल्या अनेक वर्षांपासून वटवाघळांची मोठी वसाहत आहे. या गुहेत जगातील दुर्मिळ वटवाघळांची जात अाहे. मार्च २०२० मध्ये पुणे येथील नॅशनल इन्स्टिटयुट आॅफ व्हायराॅलाॅजी या संस्थेचे काही शास्त्रज्ञ या ठिकाणी आले होते. त्या शास्त्रज्ञांनी वटवाघळांचे काही नुमने गोळा केले. याचे पुणे येथील संस्थेत संशोधन करण्यात आले. या संशोधनाचा एक अहवाल त्यांनी प्रसिध्द केला होता. तो नुकताच बाहेर आला असून त्या अहवालानुसार महाबळेश्वरच्या जंगलातील वटवाघाळांमध्ये निपाह रोगाच्या अॅन्टिबाॅडीज सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. या अहवालामुळे महाराष्ट्रात चांगलीच खळबळ माजली आहे. कारण या रोगाचा मृत्युदर कोरोनापेक्षा अधिक आहे. शिवाय या रोगावर औषध अथवा लस देखिल नाही, असे म्हटले जाते.

  उलट-सुलट चर्चेने संभ्रम

  महाबळेश्वर व पाचगणी पर्यटन स्थळे लाॅक करण्यात आली आहेत, अशा वृत्तामुळे महाबळेश्वर व पांचगणीचे पर्यटन धोक्यात आले आहे. लाॅकडाउनमुळ अाधीच तीन ते चार महिने महाबळेश्वर बंद करण्यात आले होते. कोरोना रूग्ण वाढीचा दर खाली येताच महाबळेश्वर व पाचगणी ही पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली झाली. दोन्ही पर्यटन स्थळे पर्यटकांच्या गर्दीने बहरली आहेत. परंतु उलट-सुलट चर्चेने पर्यटक व स्थानिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे

  घाबरण्याचे कारण नाही

  निपाह संदर्भात येथील तहसिलदार सुषमा चैधरी पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ज्या गुहेतील वटवाघळां बाबत अहवाल प्रसिध्द झाला आहे, ती गुहा मालुसर या गावापासून जवळ आहे. या गावातील कोणालाही या निपाहची लागण झालेली नाही. निपाहच नाही तर कोरोनाच्या दोन्ही लाटात या गावातील एकाही व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली नाही. त्यामुळे निपाहचा धोका संभवित नाही. महाबळेश्वर येथे आजपर्यंत कोणालाही या निपाहची लागण झालेली नाही अथवा निपाहची लागण झालेला एकही रूग्ण महाबळेश्वर तालुक्यात अाढळलेला नाही. त्यामुुळे महाबळेश्वरच्या नागरिकांनी अथवा पर्यटकांनी काही घाबरण्याचे कारण नाही, असे त्या म्हणाल्या

  गुहेतील वटवाघळे पावसामुळे गुहेच्या बाहेर येत नाहीत. ही वटवाघळे फळे खाणारी असून या वटवाघळांनी खाल्लेली फळे जर कोणी खाल्ली तरच निपाहचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे, परंतु अशी शक्यता फारच कमी अाहे. गुहेच्या परीसरात स्थानिक गुराखी व शेतकरी नेहमी जातात. या गुहे जवळच एक मंदिर आहे. या मंदिरातही भाविक नियमीत जातात त्यामुळे निपाहला घाबरण्याचे कारण नाही.

  – सुषमा चैधरी-पाटील, तहसिलदार