सेवानिवृत्तांनी समाजकार्यात झोकून द्यावे : संदिप मांडवे

    वडूज : शासकीय सेवेमध्ये अधिकारी, कर्मचार्‍यांना शिस्तबध्द काम करण्याची सवय झालेली असते. या सवयीचा फायदा समाजाला होण्यासाठी सेवानिवृत्तांनी समाजकार्यात झोकून द्यावे, असे आवाहन पंचायत समितीचे माजी सभापती संदिप मांडवे यांनी केले. वडूज येथील छत्रपती शिवाजी ज्यु. कॉलेजचे प्रा. हणमंतराव डावरे यांच्या सेवानिवृत्ती सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

    यावेळी उपअभियंता एस. के. झेंडे, प्रा. राजेंद्र खराडे, आयुर्विम्याचे वरिष्ठ अधिकारी बाळासाहेब किरतकुडवे, सेवानिवृत्त पोस्ट अधिकारी उत्तमराव मस्के, एम. बी. भोकरे, अकबर मुलाणी, विठ्ठलराव माने, शशिकांत देशमुख, बोडरे यांची उपस्थिती होती. मांडवे म्हणाले, चितळीसारख्या ग्रामीण भागात जन्म घेतलेल्या प्रा. डावरे यांनी वडूज येथे तालुक्याच्या गावातील ज्युनिअर कॉलेजमध्ये काम करताना आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे. विद्यार्थ्यांना भूगोल विषयाचे चांगले ज्ञान देण्याबरोबर जीवनात शिस्तपालनाचे महत्व योग्यप्रकारे पटवून दिले.

    शैक्षणिक क्षेत्रात काम करत असतानाही त्यांनी चितळी गांव तसेच वडूज परिसरात सामाजिक बांधिलकीचे विविध उपक्रम राबविले आहेत. भविष्यकाळात त्यांनी विधायक कामासाठी आणखी जादा वेळ द्यावा. धनंजय क्षीरसागर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. बहुजन हितकारणी सामाजिक संस्था व प्रा. डावरे मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.