सह्याद्रीच्या मदतीला धावला कृष्णाकाठ! डॉ. अतुल भोसले सहकारमंत्र्यांच्या विजयाचे शिल्पकार

अतुल भोसलेंचे सैन्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात सामिल झाले. त्याचवेळी डॉ. भोसले गट बाळासाहेबांच्या मदतीला पुढे आल्याचे संकेत मिळाले. भाजपच्या मदतीच्या जोरावर राष्ट्रवादी राष्ट्रीय काँग्रेसला जोरदार टक्कर देणार अशी चर्चा सुरू झाली आणि प्रत्यक्षात घडलेही तसेच.

  पराग शेणोलकर, कराड : संपूर्ण राज्याचे लगून राहिलेल्या सातारा जिल्हा बँकेतील सहकारमंत्री बाळासाहेब पाटील विरूध्द माजीमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पूत्र अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्यातील हायहोल्टेज लढतीकडे. या लढतीत सह्याद्रीच्या मदतीला कृष्णाकाठ धावून आला. भाजपचे प्रदेश सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी केलेल्या मौलिक सहकार्याच्या जोरावर बाळासाहेब यांना जिल्हा बँकेतील काँग्रेसचा प्रवेश रोखण्यात यश आले. त्यामुळे सहकारमंत्र्यांच्या विजयाचे डॉ. भोसले शिल्पकार ठरले आहेत.

  सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत माजीमंत्री स्वर्गीय विलासराव पाटील-उंडाळकर यांनी अखंडपणे 54 वर्ष काम केले. कधी निवडू तर कधी बिनविरोध असा त्यांचा बँकेतील राजकीय प्रवास राहिला आहे. त्यांच्या निधनानंतर पूत्र अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना संधी देण्यात यावी, अशी जनभावना होती. त्यासाठी वरिष्ठ पातळीवरही प्रयत्न झाले. मात्र, तसे घडले नाही. राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आम्ही सत्तेसाठी नाही तर सेवेसाठी जिल्हा बँकेची निवडणूक लढवत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राष्ट्रवादी विरूध्द काँगे्रस अशी लढाई चांगलीच रंगली.

  या लढतील कराड उत्तरेत 52 आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात 88 असे 104 मतांचे बलाबल होते. आणि याच मतदारसंघातून विलासकाकांनी यशवंत विचारांच्या जोरावर प्रतिनिधीत्व केले आहे. त्यामुळे ही निवडणूक सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना तितकी सहज आणि सोपी नाही, हे संपूर्ण राज्याला माहित होते. परंतु, निवडणुकीत विजय महत्वाचा असतो. तो मिळवण्यासाठी वाटेलते करण्याची तयारी कराड सोसायटी मतदार संघातील दोनही उमेदवारांनी केल्याचे दिसून आले. यात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना 74 तर उदयसिंहाना 66 मते मिळाली.

  गत विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरूध्द निवडणूक लढवणारे आणि दोन नंबरची मते घेणारे कृष्णाकाठचे नेते भाजपचे प्रदेश सदस्य डॉ. अतुल भोसले यांची भूमिका जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महत्वपूर्ण ठरली आहे. जेष्ठ नेते मदनराव मोहिते, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, भाजपाचे प्रदेश सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना पाठिंबा दिला. त्यामुळे बाळासाहेबांना कृष्णाकाठावरून ताकद मिळाली. या ताकदीच्या जोदारवर जिल्हा बँकेतील काँग्रेसची घौडदौड थांबवण्यात बाळासाहेब पाटील यशस्वी झाले आहेत.

  अतुल भोसलेंचे सैन्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात सामिल झाले. त्याचवेळी डॉ. भोसले गट बाळासाहेबांच्या मदतीला पुढे आल्याचे संकेत मिळाले. भाजपच्या मदतीच्या जोरावर राष्ट्रवादी राष्ट्रीय काँग्रेसला जोरदार टक्कर देणार अशी चर्चा सुरू झाली आणि प्रत्यक्षात घडलेही तसेच.

  या हायहोल्टेज लढतीत सर्वच्यासर्व 140 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे निकालाची उत्सुकता अधिकच ताणली गेली. कराड उत्तर असो वा दक्षिण कोणीही आपआपल्या मतदारसंघात पैकीच्यापैकी मते घेईल, असे होणारच नव्हते. मात्र, विलासकांकाचा दोनही मतदारसंघावर तेवढाच प्रभाव असल्याने उंडाळकर गटाचे पारडे जड होते. त्यात कराड सोसायटी मतदारसंघाच्या दृष्टीने ठरावही काका गटाकडे जास्तीचे होते. मात्र, कराड दक्षिणेतील बदलत्या राजकीय समिकरणात अनेक काकाप्रेमींनी भोसले गटाशी जुळवून घेतले आहे. भोसले गटाकडे दोनही उमेदवारांना विजयी करण्याएवढी मतदान संख्या होती. त्यामुळे भोसले ज्यांच्या झोळीत मतदान टाकणार त्यांचा विजय निश्चित मानला गेला होता. दरम्यान, भोसले गटातील पूर्वीचे काका निष्ठावंत काकांच्या पश्चात होत असलेल्या आणि प्रतिष्ठेच्या निवडणुकीत उदयसिंहांना मदत करतील, असा अंदाज होता. मात्र, तो सपशेल फोल ठरला. त्यांनी जिकडे अतुलबाबा तिकडे गुलाल या राजकीय समिकरणानुसारच काम केल्याने सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विजयाचा मार्ग सुखकर झाला आहे.

  भविष्यातील राजकीय समिकरणे बदलणार
  सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक आणि निकाल कराड दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदार संघातील राजकीय समिकरणे बदलणार आहेत. कराड नगरपालिका, शेती उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्यासह सहकारातील विविध निवडणुकात राष्ट्रावादी आणि भाजप एकत्रित निवडणुका लढल्यास आश्चर्य वाटायला नको.सध्या कराड नगरपालिकेच्या अनुषंगाने शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने बाळासाहेबांच्या शामियानात डॉ. अतुल भोसले, जनशक्तीचे राजेंद्रसिंह यादव यांनी हजेरी जावत भविष्यातील युतीचे संकेत दिले असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.