संभाजी भिडेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; बंद दारआड झाली चर्चा

सुमारे तासभर बंद दारआड चर्चा झाल्याने नेमके काय मुद्दे होते, याची उत्सुकता आता ताणली गेली आहे. मात्र, मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट केले.

    सातारा : राज्यात भाजप सेना युतीचे संकेत देणारी वक्तव्य मुख्यमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून केली जात असतानाच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी (Sambhaji Bhide) यांनी शिवसेनेचे नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची त्यांच्या दरे (ता.महाबळेश्वर) या गावी जाऊन भेट घेतली. खासदार उदयनराजेंनी बोटीतून जाऊन मंत्री शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी भिडे गुरुजींनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खुमासदार चर्चा सुरु आहे.

    सुमारे तासभर बंद दारआड चर्चा

    खासदार उदयनराजे यांनी मराठा आरक्षण व सातारा शहरातील पालिकेच्या विविध विकासकामांसंदर्भात मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी भिडे गुरुजी यांनी भेट घेतल्याने या दोन्ही भेटीतून काय घडणार का, याची चर्चा सुरु झाली आहे. याविषयी भिडे गुरुजी यांनी भेटीचे कारण माध्यमांना सांगण्याचे टाळले.

    सुमारे तासभर बंद दारआड चर्चा झाल्याने नेमके काय मुद्दे होते, याची उत्सुकता आता ताणली गेली आहे. मात्र, मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट केले. बंदव्दार चर्चेनंतर मंत्री शिंदे यांच्या शेतात संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते फणसाचे रोप लावण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.