सहकारमंत्री-माजी सहकारमंत्री पुत्रात रस्सीखेच

सहकार मंत्री पाटील व उदयसिंह पाटील यांच्यासमोर सोसायटी मतदार संघाशिवाय कृषी उत्पादन प्रक्रिया सहकारी संस्था व नागरी बँका, पतसंस्था मतदार संघाचा पर्याय आहे. मात्र दोन्ही पाटील सोसायटी मतदार संघासाठी आग्रही आहेत. बारामतीकर यावर कोणता तोडगा काढतात, हे पहावे लागेल.

  पुणे / संदीप पाटील : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा (Satara District Bank Election) बिगुल वाजण्यापूर्वी सर्वाधिक चर्चेत आहे तो, सोसायटी मतदारसंघ. त्याचं कारण आहे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व माजी सहकार मंत्री विलासराव पाटील (उंडाळकर) यांचे पूत्र उदयसिंह पाटील यांची दावेदारी. या पेचावर राष्ट्रवादी विशेषतः बारामतीकर कसा ‘सुवर्णमध्य’ काढणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. जिल्हा बॅकेच्या सभागृहात नव्या नेतृत्त्वाचा ‘उदय’ होणार का ? याची उत्कंठा अवघ्या राज्याला लागून राहिली आहे.

  विलासकाकांचा ‘अजिंक्य’ गड 

  सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रदीर्घ काळ माजी सहकार मंत्री स्व. विलासराव पाटील (उंडाळकर) यांचा अंमल होता. माजी सहकार मंत्री स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्या साथीने उंडाळकर यांनी बँकेची सूत्रे आपल्या हाती ठेवली होती. कराड दक्षिण मतदार संघातून आमदारकीची सप्तपदी पूर्ण करणाऱ्या उंडाळकर यांच्या प्रमुख सत्ता केंद्रापैकी एक जिल्हा बॅक होती. जिल्हा बंॅकेतूनच उंडाळकर यांचे नेतृत्त्व बहरले. बॅकेचे संचालक, उपाध्यक्ष, अध्यक्ष, आमदार अशी मजल दरमजल करीत उंडाळकर यांनी मंत्रीपदाला गवसणी घातली. स्व. आबासाहेब वीर यांचं बोट धरून राजकारणात आलेल्या उंडाळकर यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवली होती. जिल्हा बॅक, जिल्हा परिषदेत उंडाळकराचा शब्द प्रमाण असायचा. मात्र राष्ट्रवादीला जिल्हा बंॅकेची एकहाती सत्ता हवी होती. जिल्ह्यातील शिलेदारांची एकत्रित मोट बांधून राष्ट्रवादीने उंडाळकर यांच्या ताब्यातील बॅक आपल्या ताब्यात घेतली. बॅकेची सत्ता गेली तरी त्यांचा परंपरागत सोसायटी मतदार संघ ‘अजिंक्य’ राहीला.

  बारामतीकर ताेडगा काढणार ?

  उंडाळकर यांनी ४५ वर्षे सोसायटी मतदारसंघातून जिल्हा बँकेचे प्रतिनिधित्व केलं. आता हाच मतदारसंघ जिल्हा बँकेच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना या मतदारसंघातून जिल्हा बँकेत प्रवेश करायचा आहे. तर विलासकाकांचे पूत्र उदयसिंह यांनी वडिलांच्या जागेवर आपलाच हक्क असल्याचा दावा केला आहे. या मतदारसंघातून सर्वांधिक ठराव आपल्या गटाचे असल्याचा दावा उंडाळकर गटाचा आहे. मात्र, बदलत्या राजकीय समीकरणात आपली सरशी होऊ शकते, असा मंत्री पाटील गटाचा व्होरा आहे.

  सहकारमंत्र्यांनी सोसायटी मतदारसंघाची जागा प्रतिष्ठेची केली असली तरी उदयसिंह पाटील आपल्या हक्काची जागा सहजासहजी सोडणार नाहीत. या जागेवर जिल्हा बॅकेच्या निवडणुकीचे संभाव्य ‘रण’ ठरणार आहे. राष्ट्रवादीच्या धुरिणांनी याचा विचार केला असणारचं! बिनविरोधच्या फाॅर्म्युल्याला धक्का लागणार नाही, ही बारामतीकरांची पहिली सावधगिरी असेल. सहकार मंत्री पाटील व उदयसिंह पाटील यांच्यासमोर सोसायटी मतदार संघाशिवाय कृषी उत्पादन प्रक्रिया सहकारी संस्था व नागरी बँका, पतसंस्था मतदार संघाचा पर्याय आहे. मात्र दोन्ही पाटील सोसायटी मतदार संघासाठी आग्रही आहेत. बारामतीकर यावर कोणता तोडगा काढतात, हे पहावे लागेल.

  ‘दक्षिण-उत्तर’चे बदललेले अंतरंग

  बाळासाहेब पाटील यांचे वडिल माजी आमदार स्वर्गीय पी. डी. पाटील व उदयसिंह पाटील यांचे वडिल स्वर्गीय विलासराव पाटील (उंडाळकर) यांच्यात परस्पर सहकार्याचा अलिखित करार होता. उत्तरेत उंडाळकर गटाने पी. डी. पाटील गटाला, तर दक्षिणेत पी. डी. पाटील गटाने उंडाळकर गटाला अप्रत्यक्ष सहकार्य करायचे, असा तो करार होता. त्यावेळी पाटील द्वयींचे राजकारणातील समान शत्रू होते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण.

   

  कालांतराने सहकारमंत्री बाळासाहेब व पृथ्वीराज चव्हाण यांच्यात सहमतीचे राजकारण सुरु झाले. विलासकाका हयात असताना उंडाळकर व चव्हाण यांच्यातही समेट झाला. विधानसभेचे प्रबळ दावेदार असलेल्या अतुल भोसले यांना रोखण्यासाठी उंडाळकर व चव्हाण गट एकवटला. कृष्णा-कोयनेच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलं आहे. जिल्हा बंॅकेच्या निमित्ताने ‘दक्षिण-उत्तर’चे बदलेले अंतरंग दिसणार आहेत.

  अतुल भाेसलेंचा सहकारमंत्र्यांना हात

  अतुल भोसले यांनी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर कराड उत्तरेतून निवडणूक लढविली. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. पुढे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१४ व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात कराड दक्षिणेतून निवडणूक लढविली, मात्र दोन्ही निवडणुकीत चव्हाण यांनी  भोसले यांच्यावर मात केली. या दोन्ही निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांची चव्हाण यांना अप्रत्यक्ष  मदत झाली. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत भोसले गटाचा मोठ्या फरकाने विजय झाल्याने भोसले गटाचा उत्साह दुणावला आहे. येणारी विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन भोसले गटाची पावले पडणार आहेत. जिल्हा बॅकेच्या निवडणुकीत अतुल भोसले यांची साथ बाळासाहेब पाटील यांना मिळाल्यास नवल वाटू नये. (atul bhosle .jpg)

  पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर पेच

  सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण, अतुल भोसले व उदयसिंह पाटील याच्यात तिहेरी लढत झाली. यात भोसले यांनी लक्षणीय मते मिळवित चव्हाण यांना झगडायला लावले. उदयसिंह पाटील यांच्या उमेदवारीचा अप्रत्यक्ष लाभ चव्हाण यांना झाला. आणि ते निवडून आले. निकालानंतर उदयसिंह यांनी थेट चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन चव्हाण यांचे अभिनंदन केले. कराड दक्षिणच्या बदलेल्या समिकरणाची ही नांदी होती.

  काही दिवसांतच पृथ्वीराज चव्हाण व विलासराव पाटील  (उंडाळकर) यांच्यात दिलजमाई झाली. उदयसिंहासाठी ही जमेची बाजू आहे. चव्हाण यांना विधानसभेला बाळासाहेब पाटील व उदयसिंह पाटील यांची अप्रत्यक्ष मदत झाली आहे. जिल्हा बॅकेच्या निवडणुकीत चव्हाण यांना उदयसिंह पाटील यांना साथ देताना बाळासाहेब पाटील दुखावणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागणार आहे.