वाईच्या ओझर्डेत बेरोजगारीचा दुसरा बळी; २८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    वाई : ओझर्डे (कदमवाडी) ता.वाई येथील रहिवासी असलेला अभिजीत भिकू कदम या २८ वर्षीय तरुण गेल्या काही वर्षांपासून वाईच्या एमआयडीसीमधील एका नामांकित कंपनीत नोकरीला होता. कंपनीने लॉकडाऊनचे कारण सांगत तीन महिन्यांपूर्वी त्याला अचानकपणे कामावरून काढले. त्यानंतर आलेल्या नैराश्येत त्याने राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

    दोन दिवसांपूर्वीच चिंधवली ता. वाई येथील महादेव संजय पवार या २७ वर्षीय तरुणानेही बेरोजगारीला कंटाळून रहात्या घराच्या पाठीमागे कृष्णा नदी पात्रालगत असलेल्या बाबळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली होती. कामगार असलेल्या तरुणांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून कामगारांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. नोकरी नसल्याने आपल्याला कोणीही मुलगी देणार नाही. आई वडिलांचे निधन झाल्याने हा घरामध्ये एकटाच राहत असल्याने नोकरीवरून कमी केल्याची खंत त्याला नेहमीच सतावत होती.

    वाईच्या नामांकीत कंपनीत गेल्या कित्येक वर्षांपासून काम करीत होता. पण गेल्या तीन महिन्यांपूर्वी मयत अभिजीतला कामावरून काढून टाकल्याने त्याला मनस्ताप होत होता. तो सदैव गोंधळलेल्या मनस्थितीत वावरताना दिसायचा कोरोनोचा आधार घेऊन वाईच्या एमआयडीसीमधील कंपनीच्या व्यवस्थापनाने मर्जीतील कामगारांना कामावर ठेवले. कोणाची तरी सोय करण्यासाठी अनेक चांगल्या कामगारांनाही कामावरून काढून टाकले आहे. लॉकडाऊनमुळे गेली कित्येक वर्षांपासून काम करत असलेल्या अनेक कामगारांना व्यवस्थापनाने घरीच बसवले आहे. त्यामुळे अनेक कामगार आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेले दिसून येत आहेत.

    वास्तविक, पाहता कंपनीच्या व्यवस्थापनाने लॉकडाऊनच्या कालावधीत कामगार कपात करताना गरजू कामगारांचा विचार करून त्यांना कामावर ठेवणे अपेक्षित होते. पण ज्यांचा वशिला कमी पडला, अशांना घरचा रस्ता दाखवला त्याचे रुपांतर आज आत्महत्येत होताना दिसत आहे.

    चिंधवली येथील महादेव संजय पवार (वय २७) आणि ओझर्डे येथील अभिजीत भिकू कदम (वय २८) या दोन तरुण कामगारांनी गळफास लावून आत्महत्या केली. वाईच्या इतिहासात नोकरीवरुन कमी केले म्हणून आत्महत्येसारखा मार्ग याआधी कधीच पाहायला मिळाला नाही. या आधी गेली कित्येक वर्षे विदर्भातील शेतकरी कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या करत होते. पण वाई तालुक्यात कामगार कपातीमुळे तरुणांच्या होत असलेल्या आत्महत्या ही बाब नक्कीच चिंताजनक आहे. आणखी किती तरुणांचे बळी घेतल्यावर लोकप्रतिनिधींसह जिल्हा प्रशासन यात लक्ष घालणार? असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.