सातारा जिल्हा बँक निवडणुकीत शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का ; ज्ञानदेव रांजणे यांच्याकडून अवघ्या एक मताने पराभव

शशिकांत शिंदे म्हणाले होते, जिल्हा बँकेची जावली सोसायटीची निवडणूक ही राजा विरूध्द प्रजा अशीच झाली, त्यामुळेच ही निवडणुक जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात गाजली. ज्यांना मी वाढवले तेच मला हद्दपार करायला निघालेत. मात्र, आता तालुक्यात नवी समीकरणे उदयास येणार हे निश्चित. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वजणांनी एकत्र येऊन तालुक्यात वज्रमूठ तयार केली आहे.

    सातारा : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा बँक निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्यांचे विरोधक ज्ञानदेव रांजणे यांना २५ तर शशिकांत शिंदे यांना २४ मते मिळाली. त्यामुळे शिंदे यांचा एका मताने पराभव झाला आहे. आज सकाळी सुरु झालेल्या मतमोजणीत जावळीतून हा धक्कादायक निकाल हाती आला आहे.

    जावली प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघात एकूण ४९ मते असून इथे १०० टक्के मतदान पार पडले होते. यात सगळी मते वैध ठरली असून यात शशिकांत शिंदे यांना २४ तर ज्ञानदेव रांजणे यांना २५ मत मिळाली.

    काल निकालापूर्वी प्रतिक्रिया देताना शशिकांत शिंदे म्हणाले होते, जिल्हा बँकेची जावली सोसायटीची निवडणूक ही राजा विरूध्द प्रजा अशीच झाली, त्यामुळेच ही निवडणुक जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात गाजली. ज्यांना मी वाढवले तेच मला हद्दपार करायला निघालेत. मात्र, आता तालुक्यात नवी समीकरणे उदयास येणार हे निश्चित. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वजणांनी एकत्र येऊन तालुक्यात वज्रमूठ तयार केली आहे. वेळ आल्यावर व्याजासकट त्यांची परतफेड करणार आहे, असा सूचक इशाराही शिंदे यांनी मानकुमरे व रांजणे यांना दिला होता.