पाटणात शिवसेनेची मुसंडी ; २५ टक्के मतदान वाढल्याचा गृहराज्य मंत्री शंभूराज देसाईंचा दावा

पाटण नगरपंचायतीत गतवेळी केवळ २ जागेसाठी शिवसेनेने प्रयत्न केला असताना २ जागा तर मिळाल्याच, त्या बरोबर पाटण शहरातील १७ टक्के मतदानही मिळाले. यावेळी तर शिवसेनेने दोन जागा कायम ठेवत विरोधकांच्या गावात शिवसेनेचे संपूर्ण पॅनेल उभे करून आणि गतवेळीपेक्षा जास्त मतांची टक्केवारी खेचली. त्यामुळे 'अपयश' नेमके कुणाचे हे जनतेला माहित झाले आहे. येत्या काळात शहरात मोठा बदल घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  पाटण : नुकत्याच झालेल्या पाटण नगरपंचायतीच्या निवडणुकीत विरोधकांच्या गावात घुसून शिवसेनेने २ जागा कायम ठेवल्या आहेत. पाटण शहरात गतवेळीपेक्षा पाच टक्क्यांनी शिवसेनेचे मताधिक्य वाढवून ते २५ टक्यांवर नेले आहे. त्यामुळे पाटण शहरात शिवसेनेला अपयश मिळाले, ही बाब चुकीची असून खऱ्या अर्थाने शिवसेनेने सर्व जागा लढवून पाटण शहरात गतवेळच्या तुलनेत मुसंडी मारल्याचे स्पष्ट होत असल्याची प्रतिक्रिया राज्याचे गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

  देसाई म्हणाले, लोकांनी दिलेला कौल आम्ही लोकशाही मार्गाने स्वीकारला आहे. पाटण हे गाव पारंपरिकदृष्ट्या विक्रमसिंह पाटणकर यांचे गाव आहे. आम्ही त्या ठिकाणी पहिल्यापासूनच अल्पमतात होतो. त्यामुळे काही ठिकाणी अपयश आले. मात्र यावेळी १६ ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे केले व २ उमेदवार निवडून आणले.शहरातील मतदारांच्या मानसिकतेत बदल झाला असून २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेला २१ टक्के मते होती. मात्र आता ही टक्केवारी २५ टक्क्यावर पोहोचली आहेत.

  पाटण शहराचा विकास करणार

  पाटण शहराच्या विकासासाठी जो शब्द दिला होता, तो शब्द शिवसेना, स्थानिक आमदार व राज्यमंत्री म्हणून लोकांच्या विकासासाठी मी सतत कटिबद्ध आहे.

  मरळीत पूर्ण पॅनल उभे करून दाखवा!

  विरोधकांनी मरळी गावात येऊन पूर्ण पॅनल उभे करून दाखवा, असे आव्हान ना. देसाई यांनी विरोधकांना दिले. तसेच आगपाखड करण्यापेक्षा आमचा मतदानाचा टक्का वाढल्याचे मान्य करा, असे ना. देसाई यांनी सांगितले. तसेच ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात झाली. मतदारांनी कौल दिला आहे, तो आम्ही स्वीकारला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  ही तर सुरुवात आहे..!

  पाटण नगरपंचायतीत गतवेळी केवळ २ जागेसाठी शिवसेनेने प्रयत्न केला असताना २ जागा तर मिळाल्याच, त्या बरोबर पाटण शहरातील १७ टक्के मतदानही मिळाले. यावेळी तर शिवसेनेने दोन जागा कायम ठेवत विरोधकांच्या गावात शिवसेनेचे संपूर्ण पॅनेल उभे करून आणि गतवेळीपेक्षा जास्त मतांची टक्केवारी खेचली. त्यामुळे ‘अपयश’ नेमके कुणाचे हे जनतेला माहित झाले आहे. येत्या काळात शहरात मोठा बदल घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.