धक्कादायक! नगरसेवक अनुप शहा यांना जीवे मारण्याची धमकी

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तक्रारदार अनुप शहा यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर मनिषा घोलप यांचे प्रकरण त्यांनी निकालाच्या प्रतिक्षेवर ठेवले आहे. अनुप शहा जिल्हाधिकारी यांच्या दालनातून बाहेर आल्यानंतर किशोर घोलप यांनी अनुप शहा यांना अडवून माझ्या पत्नीच्या विरोधात तू तक्रार का केलीस? जर माझी पत्नी अपात्र ठरली तर तूला जिवंत ठेवणार नाही, असे म्हणत अर्वाच्च भाषेत शहा यांना शिवीगाळ केली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली.

    सातारा : फलटण पालिकेचे स्वीकृत नगरसेवक अनुप शहा यांना फलटण पालिकेतीलच नगरसेविका मनिषा घोलप यांचे पती किशोर घोलप यांनी माझ्या पत्नीची जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केलीस. यात जर ती अपात्र ठरली तर तुला जिवे मारुन टाकीन, असे म्हणत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. दरम्यान, शहा यांनी किशोर घोलप यांच्याविरोधात जिल्हाधिकार्यांकडे तक्रार दाखल केली असून सातारा शहर पोलीस ठाण्यातही तक्रारअर्ज दिलेला आहेे.

    याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावण्या ठेवल्या होत्या. त्यानुसार फलटण पालिकेतील स्वीकृत नगरसेवक अनुप शहा यांनी नगरसेविका मनिषा घोलप या फलटण पालिकेच्या सर्वसाधारण सभेला तब्बल सहा महिने गैरहजर होत्या. त्यामुळे त्यांना नगरसेविका पदावरुन तत्काळ हटवून अपात्र करा, अशी तक्रार सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. गेल्या वर्षभरापासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकार्यांनी यासंदर्भातील सुनावण्या घेतल्या नव्हत्या. मात्र, आज दि. 28 रोजी सातारा जिल्हाधिकार्यांनी दोन्ही बाजूंकडील अभ्यागतांना सुनावणीसाठी आपल्या कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यानुसार तक्रारदार अनुप शहा तसेच ज्यांच्या विरोधात तक्रार केली आहे, त्या मनिषा घोलप आपल्या पतीसह जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होत्या.

    दरम्यान, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तक्रारदार अनुप शहा यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर मनिषा घोलप यांचे प्रकरण त्यांनी निकालाच्या प्रतिक्षेवर ठेवले आहे. अनुप शहा जिल्हाधिकारी यांच्या दालनातून बाहेर आल्यानंतर किशोर घोलप यांनी अनुप शहा यांना अडवून माझ्या पत्नीच्या विरोधात तू तक्रार का केलीस? जर माझी पत्नी अपात्र ठरली तर तूला जिवंत ठेवणार नाही, असे म्हणत अर्वाच्च भाषेत शहा यांना शिवीगाळ केली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली. शहा-घोलप यांच्या हमरीतुमरीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. हा प्रकार घडल्यानंतर शहा यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेवून घडला प्रकार त्यांच्या कानावर घातला. जिल्हाधिकार्यांनी या प्रकरणाची तत्काळ गांभीर्याने दखल घेत शहा यांना घोलप दाम्पत्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची सूचना केली. त्यानुसार शहा यांनी तत्काळ सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली असून यासंदर्भात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रारअर्ज दिलेला आहे.