प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

स्नेहल गोरे असे अपहरण झालेल्या महिलेचे नाव असून यासंपूर्ण प्रकरणानंतर त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. मात्र, त्याचा गुन्हा मोहोळ पोलिसांनी सातारा शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे.

    सातारा : सहा वर्षाच्या बालिकेचा ताबा मिळावा म्हणून सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून मित्राच्या सहाय्याने स्वत:च्या पत्नीचे हातपाथ बांधून तिला जीवे मारण्याची धमकी देत तिचे अपहरण करणाऱ्या पतीवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

    तानाजी गोरे असे पतीचे तर विठ्ठल माळी असे गुन्हा दाखल झालेल्या मित्राचे नाव असून ते दोघेही सोलापूर जिल्ह्यातील आहेत. या दोघांनाही रात्री उशिरापर्यंत सातारा शहर पोलिसांकडून अटक करण्यात आलेली नव्हती. दरम्यान, स्नेहल गोरे असे अपहरण झालेल्या महिलेचे नाव असून यासंपूर्ण प्रकरणानंतर त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. मात्र, त्याचा गुन्हा मोहोळ पोलिसांनी सातारा शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे.

    याबाबतची अधिक माहिती अशी की, स्नेहल तानाजी गोरे, (वय २५, रा. गोरे वस्ती, टेंभूर्णी रोड, कुर्डू, ता. माढा, जि. सोलापूर. सध्या रा. विमलविश्व अपार्टमेंट, खेड, ता. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तानाजी गोरे (रा. टेंभूर्णी रोड, कुर्डू, ता. माढा, जि. सोलापूर) याचा पहिला विवाह झाला असतानादेखील त्याने ही बाब लपवत स्नेहल यांच्याशी लग्न केले. या दोघांना सहा वर्षाची मुलगी असून तिचे नाव तेजस्वी असे आहे. मात्र, तानाजीने फसवणूक केली असल्याचे लक्षात येताच या दोघांचा घटस्फोटाचा खटला आता न्यायालयात सुरु आहे. तानाजीला मुलगी तेजस्वी हिचा ताबा हवा आहे. मात्र, तेजस्वी ही स्नेहल यांची आई प्रमिला यांच्याकडे पुण्यात असते.

    मंगळवार, दि. २३ रोजी रात्री दहा ते गुरुवार, दि. २४ रोजी दुपारी साडेबारा या कालावधीत तानाजी याने विठ्ठल माळी (रा. पंढरपूर, जि. सोलापूर) याच्याशी संगनमत करुन स्नेहल यांना जबरदस्तीने कारमध्ये (एमएच ४५ – एडी ३३८५) बसवले. स्नेहल यांनी प्रतिकार करताच त्यांचे हातपाय रस्सीने तर तोंडही बांधले. यावेळी त्यांना हाताने मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी केली. दरम्यान, सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून स्नेहल यांना जबरदस्तीने गाडीत बसवून तिला पंढरपूर, मोहोळ, अक्कलकोट असा प्रवास करत अगदी कर्नाटक राज्याच्या सीमपर्यंत आणले. यानंतर तानाजी याने स्नेहल यांच्या आई प्रमिला यांना फोन करुन ‘तेजस्वी हिला माझ्या ताब्यात द्या; नाहीतर स्नेहल हिला जीवे ठार मारुन टाकतो,’ अशी धमकी दिली.
    या घटनेनंतर स्नेहल यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात एक लेखी तक्रार अर्ज दिल्यानंतर तानाजी आणि विठ्ठल या दोघांनाही मोहोळ पोलिसांनी बोलावून घेतले होते. येथे झालेल्या चर्चेचा तपशील काही समजू शकलेला नाही. मात्र, त्यांनी तो गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला. यानंतर गुरुवार, दि. २५ रोजी चार वाजण्याच्या सुमारस तानाजी गोरे आणि विठ्ठल माळी या दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आलेली नव्हती. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे करत आहेत. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अगदी कसून तपास करत आहेत.