बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेच्या अध्यक्षपदी श्रीराज दीक्षित

    सातारा : बिल्डर्स असोसिएशन साताराची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यामध्ये यापूर्वी लॉकडाऊनच्या प्रतिकूल परिस्थितीत पण चांगले काम केल्याचे पाहून सर्वानुमते चर्चा करून ठरल्याप्रमाणे मागील 2020-21 च्या सर्व पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ देऊन पुढील नवीन वर्षीसाठी त्याच कमिटीला संधी देण्यात आली. यामध्ये चेअरमन म्हणून श्रीराज दीक्षित, व्हा.चेअरमन राजेश देशमुख, सेक्रेटरीपदी साहिल शेख, खजिनदार विजयसिंह जगदाळे, कौन्सिल मेंबर सचिन देशमुख आणि अशोक शिंदे अशी निवड करण्यात आली.

    यावेळी नूतन कार्यकारिणीचा पदभार बिल्डर्स असोसिएशनचे स्टेट चेअरमन रणधीर भोईटे व माजी स्टेट चेअरमन सुधीर घार्गे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना स्टेट चेअरमन रणधीर भोईटे म्हणाले की, सातारा बीएआय सेंटरचे काम संपूर्ण देशभरात कौतुकास्पद असे आहे. सातारा सेंटर अनेक नाविन्यपूर्ण उप्रकम राबवित असून, त्याची दखल देशपातळीवरही घेतली जाते. सातारा सेंटरच्या पाठिंब्यामुळेच मला स्टेट चेअरमन पद मिळू शकले. यावेळी सातारा सेंटरचे अध्यक्ष श्रीराज दीक्षित यांनी मागील वर्षात कोरोना महामारीमुळे अतिशय कठीण काळातही सर्व सभासदांच्या सक्रीय पाठिंब्यामुळे अनेक कार्यक्रम यशस्वी करता आले, असे मनोगत व्यक्त केले. साहिल शेख यांनी मागील वर्षी झालेल्या सर्व कार्यक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.

    स्टेट चेअरमन रणधीर भोईटे यांनी सातारा बीएआयचे माजी चेअरमन व कौन्सिल मेंबर सचिन देशमुख यांना बिल्डर्स असो. महाराष्ट्र राज्यस्तरीय रिअल इस्टेट आणि युडीसीपीआर कमिटीच्या चेअरमनपदी नियुक्ती झाल्याचे पत्र दिले. सातारा बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने प्रमुख पाहुणे यांचा सत्कार शाल, श्रीफळ, फेटा व सन्मानचिन्ह देऊन श्रीराज दीक्षीत, साहिल शेख, राजेश देशमुख, विजयसिंह जगदाळे यांनी केला.

    कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिल दातीर यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेश देशमुख यांनी केले.