बांधकाम सभापती सिद्धी पवार यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामा सादर

    सातारा : सातारा नगरपालिकेच्या बांधकाम सभापती सिध्दी रविंद्र पवार यांनी आपल्या सभापतिपदाचा अधिकृतरित्या राजीनामा जिल्हाधिकारी शेखरसिंह यांना शुक्रवारी सादर केला. भुयारी गटार योजनेच्या ठेकेदाराला आक्षेपार्ह शब्दांत धमकाविल्याप्रकरणी सिध्दी पवार यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचे साताऱ्यात जोरदार राजकीय पडसाद उमटले होते.

    सिध्दी पवार यांनी आपली नाराजी खासदार उदयनराजे भोसले पत्राद्वारे प्रकट करून बांधकाम सभापती पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते. मात्र, हा राजीनामा संकेताप्रमाणे नसल्याने हे प्रकरण प्रलंबितच होते. सिध्दी पवार यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला रितसर राजीनामा जिल्हाधिकारी शेखरसिंह यांना सादर केला नगराध्यक्षांना राजीनामा पाठविण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. राजीनामा पत्रात त्यांनी एका स्त्रीची व्यक्तिगत पातळीवर झालेली बदनामी, न्यूनतम पातळीवर पोहचलेले राजकारण, विकासकामाचा आग्रह धरलेला असताना सातत्याने होणारी कोंडी अंर्तगत बेबनाव या विविध कारणांना कंटाळून आपण बांधकाम सभापती पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्रात नमूद केले आहे .

    जिथे स्त्रियांना शोभेच्या बाहुल्या म्हणून नुसतच मिरवलं जात त्यांना मान-सन्मान मिळत नसेल, त्यांना व्यक्त होण्याचा व चुकीच्या गोष्टीला विरोध करायचा अधिकारच नसेल तर स्त्रियांना देण्यात आलेले पन्नास टक्के आरक्षण काय कामाचे? म्हणून मी स्वाभिमानाने सार्वजनिक बांधकाम सभापतिपदाचा राजीनामा आज जिल्हाधिकांऱ्याकडे दिल्याची प्रतिक्रिया सिध्दी पवार यांनी दिली.