अंथरूणाला खिळलेल्या युवकाच्या मदतीला धावला सोशल मिडिया ; राजाराम सकपाळ यांना आर्थिक मदत

पाटण येथील राजाराम सपकाळ हा युवक अंथरुणावर खिळून आहे. निमित्त झाडावरून पडला एवढेच. त्यामुळे त्याला माकडहाडाचा त्रास झाला आणि तो अंथरुणाला खिळला. आई वडिलांचेही छत्र हरपले. कोल्हापूर येथील दवाखान्यात एक महिना उपचार घेतल्यानंतर एका महिन्यात काठीच्या आधाराते तो हळूहळू चालू लागला.

  पाटण: सोशल मीडियाच्या वापराबाबत मतमतांतरे आहेत. दुधारी शस्त्राप्रमाणे वाईट तसेच चांगल्या कामांसाठी सोशल मीडियाचा वापर होऊ शकतो, हे अनेक उदाहरणांवरून स्पष्ट झाले आहे. आई वडिलांचे छत्र हरविलेल्या आणि गेल्या ५ वर्षांपासून पैशाविना उपचार मिळत नसल्याने तामकडे, ता. पाटण येथील राजाराम सपकाळ (वय ३४) या युवकाला सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी आर्थिक मदतीचा हात दिला आहे.

  गेल्या ५ वर्षापासून तामकडे, ता. पाटण येथील राजाराम सपकाळ हा युवक अंथरुणावर खिळून आहे. निमित्त झाडावरून पडला एवढेच. त्यामुळे त्याला माकडहाडाचा त्रास झाला आणि तो अंथरुणाला खिळला. आई वडिलांचेही छत्र हरपले. कोल्हापूर येथील दवाखान्यात एक महिना उपचार घेतल्यानंतर एका महिन्यात काठीच्या आधाराते तो हळूहळू चालू लागला. मात्र पुढील उपचारासाठी ३ महिने दवाखान्यात थांबावे लागणार होते. त्यासाठी त्याला खऱ्या अर्थाने पैशाची नितांत गरज होती.

  दीपक मांडवकर यांनी आपले मित्र पवन तिकुडवे, दशरथ पाटील यांच्या मदतीने सोशल मीडियावर ग्रुप तयार करून मदतीसाठी आवाहन केले. त्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला. तालुक्याबाहेरील मंडळींनीही जमेल तेवढी आर्थिक मदत केली. केवळ चार दिवसात ३२ हजार रुपयांची मदत गोळा झाली. ही त्याला त्याच्या घरी जाऊन प्रत्यक्षात देण्यात आली. यावेळी राजाराम सपकाळ या युवकाने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत सर्वांचे आभार मानले.

  अद्यापही त्याला पुढील उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असून दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन एक हात मदतीचा द्यावा, असे आवाहन पवन तिकुडवे यांनी केले आहे. मदत देतेवेळी त्रिपुडीचे उपसरपंच राहुल देसाई, सत्यवान मोरे, अजय बर्गे, विकास कदम, दत्तात्रय पवार, सुरेश मांडवकर, माजी उपसरपंच सुतार उपस्थित होते.

  दुःख, राग, द्वेष पेराल तर निसर्गाकडून शेकडो, हजार पटीने तेच परत मिळेल. पण आनंद, प्रेम, माणुसकी पेराल तर शेकडो हजार पटीने तेच आपल्याला प्रकृतीकडून निसर्गाकडून परत मिळेल. सोशल मीडियावर आवाहन करून आज सर्वांनी जी काही मदत गोळा करून दिली आहे, ती निश्चितच महत्त्वाची आहे.

  - राहुल देसाई, उपसरंपच, त्रिपुडी.