विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी लसीकरण सुरू करा : विश्वंभर बाबर

  म्हसवड : विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे नुकसान टाळण्यासाठी युवा पिढीऐवजी शालेय विद्यार्थ्यांचे लसीकरण अग्रक्रमाने सुरू करण्याची मागणी सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस प्रा. विश्वंभर बाबर यांनी केली.

  कोरोना महामारीने विविध क्षेत्रांचे प्रचंड नुकसान केले आहे. देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे विस्कटली असून, त्यापेक्षाही भयानक नुकसान शैक्षणिक क्षेत्राचे झालेले आहे. इयत्ता दहावी-बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच लहान गट व पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. वरिष्ठ युवापिढीचे लसीकरण करण्याऐवजी प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील शालेय विद्यार्थ्यांचे लसीकरण अग्रक्रमाने करण्याची मागणी प्रा. बाबर यांनी केली.

  कोरोना महामारीमुळे आपला मुलगा कोणत्या वर्गात आहे याचा विसर पालकांना पडला आहे. पहिलीत प्रवेश घेणाऱ्या मुलांचा शैक्षणिक पाया कच्चा राहिला तर त्याचा परिणाम त्या विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी आयुष्यभर तोट्याचा राहणार आहे. नव्हे तर ती पिढी कायमची बरबादीच्या वाटेवर राहणार आहे. प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुट्टी असेल तर त्यांना अभ्यासक्रमाचा विसर पडतो आणि कोरून महामारीमुळे दीड वर्षात ही युवा पिढी संपूर्ण शैक्षणिक विश्वच विसरून गेलेली आहे. या प्रकारामुळे केवळ कुटुंबाचाच नव्हे तर देशाचा शैक्षणिक पाया कमकुवत होण्याची भीती प्रा. बाबर यांनी व्यक्त केली.

  ऑनलाईन शिक्षण प्रणाली सर्वसामान्यांसाठी म्हणावी तेवढी सोयीची नाही ही वस्तुस्थिती आहे. ग्रामीण भागात इंटरनेटचा अभाव तसेच मोबाईल व इतर सोयी सुविधांचा अभाव यामुळे सर्वसामान्य घटक शिक्षणापासून वंचित राहत आहेत. ऑफलाईन शिक्षण ही काळाची गरज आहे. प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांच्या हाताला धरून शिक्षक त्यांना लिहिण्यास शिकवितात. त्यांचा सराव करून घेतात. मात्र, सध्या गेले दीड वर्ष याचा विसर विद्यार्थ्यांना पडलेला आहे.

  ग्रामीण भागात किंवा शहरी भागातील झोपडपट्टीमध्ये काबाडकष्ट करणाऱ्या कुटुंबातील मुलांचे कोरोना कालावधीमध्ये प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे. ऑनलाइन शैक्षणिक सुविधा सर्वदूरपर्यंत पोहोचणे शक्यच नाही. कोरोना महामारीमध्येही गल्लीबोळातून लहान मुले शालेय मुले एकत्रित खेळताना दिसत आहेत. तुलनेने त्यांची प्रतिकारक्षमता ही चांगली असते. या सर्व बाबींचा विचार करता केवळ विद्यार्थी किंवा कुटुंबाचा विषय लक्षात न घेता बलशाली भारत घडविण्यासाठी कुराणाचे प्रमाण कमी असणाऱ्या ठिकाणी शाळा सुरू करणे गरजेचे आहे.

  औद्योगिक कारखान्यातील व इतर क्षेत्रांतील होणारा तोटा भरून काढता येईल. मात्र, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक तोटा भरून काढणे कठीण आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी युवा पिढीच्या अगोदर शालेय विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याची मागणी प्राध्यापक विश्वंभर बाबर यांनी केली आहे.