जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; तीन महिने वेतन न मिळाल्याचा केला निषेध

सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रशासनाचा निषेध म्हणून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले . त्यामुळे नेत्र रुग्णालय , पोस्टमॉर्टम विभाग , अतिदक्षता विभाग या सारख्या संवेदनशील कक्षांची सुरक्षितता व व्यवस्थापन दिवसभर ठप्प झाले.

    सातारा: क्रांतीसिंह नाना रुग्णालयाच्या अठरा सुरक्षा रक्षकांनी तीन महिने वेतन न मिळाल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी काम बंद आंदोलन केले .परिणामी रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेसह इतर दैनंदिन कामे खोळंबली .

    सुरक्षा रक्षकांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुभाष चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली . डॉ चव्हाण यांनी सांगलीच्या सुरक्षा सेवा मंडळाशी चर्चा करून वेतनासंदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले . सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा शल्यचिकित्सकांना सादर करण्यात आले या निवेदनात नमूद आहे की सातारा जिल्हा रुग्णालय येथे अठरा सुरक्षा रक्षक बंदोबस्तासाठी तैनात असताना सांगलीच्या सेवा सुरक्षा मंडळाने एप्रिल मे जून या तीन महिन्याचा पगार केलेला नाही . करोनाच्या काळात आम्हाला घरखर्च, घराचे हप्ते, दैनंदिन गरजा इ भागविणे कठीण झाले आहे . काही सुरक्षा रक्षकांना दुचाकीसाठी पेट्रोल नसल्याने ते कामावर हजर होवू शकत नाही . सुरक्षा सेवा मंडळाचे सातारा तालुक्यात तब्बल सत्तर कर्मचारी असताना त्यांचा अठरा महिने झाले तरी पगार करण्यात आलेला नाही .

    सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रशासनाचा निषेध म्हणून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले . त्यामुळे नेत्र रुग्णालय , पोस्टमॉर्टम विभाग , अतिदक्षता विभाग या सारख्या संवेदनशील कक्षांची सुरक्षितता व व्यवस्थापन दिवसभर ठप्प झाले .करोना कक्षांमध्ये रुम्णांना पोहचविण्यासाठी सुरक्षा रक्षकांची मदत घेतली जाते त्या सुध्दा कामांचा प्रचंड खोळंबा झाला .