मराठा आरक्षणासाठी खटाव-माणमध्ये समर्थक २६ जूनला उतरणार रस्त्यावर

  सातारा : राज्यातील इतर मागासवर्गीय, मागासवर्गीय समाजाला मिळत असलेले आरक्षण रद्द करणे, मराठा समाजाला आरक्षणात त्रुटी दाखवून रद्द करून घेणे, असा न्यालालयाचा निकाल होत आहेत. याविरोधात आता खटाव-माण तालुक्यातील जनता आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (दि. २६) रस्त्यावर उतरणार आहे. याची पूर्व तयारी म्हणून वडूज नगरीत कार्यसम्राट आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली होती.

  महाराष्ट्र राज्यातील विधिमंडळ ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय पक्षांनी आपल्या पक्षातील मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय समाज्यातील कार्यकर्त्यांना संधी मिळावी. याचा आरक्षणाच्या माध्यमातून पुरेपूर फायदा उचलून सत्ता प्रस्थापित केली आहे. मंडल आयोगाला त्यावेळी विरोध करून ‘मंडल विरोधी कुमंडल’ असा धार्मिक रंग दिला होता. परंतु, तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी वैचारिक भूमिका सोडली नाही. मंडल आयोग लागू करून इतर मागासवर्गीय समाज्याला न्याय मिळवून दिला. याला २५ वर्षे झाली असताना आता इतर मागासवर्गीयांना राजकीय आरक्षण मिळणार नाही, असे न्यायालयाने दिलेल्या निकालाने स्पष्ट झाले आहे. त्याचा फटका महाराष्ट्रातील लोकांना बसला आहे.

  मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक वर्षांपासून काही संघटना स्थापन झाल्या होत्या. कोपर्डी प्रकरणांतून मराठा आरक्षण ही मागणी जोरात पुढे आली. तेव्हापासून मागास व इतर मागास समाजाच्या आरक्षण धोरणाला धक्के बसू लागले आहेत. एकीकडे मराठा समाज्याला आरक्षण न देणे दुसरीकडे मागास व इतर मागास जातीचे आरक्षण रद्द करणे, अशी खेळी सुरु झाली आहे. त्यामुळे सर्वसाधारण समाज बांधव वगळता दोन्ही समाज्यातील घटकांची चिंता वाढली आहे.

  वडूज ता. खटाव येथे भाजप समर्थक कार्यकर्त्यानी कार्यसम्राट आमदार गोरे यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण आंदोलनाची दिशा व भाजप कार्यकारणी निवडीबाबत बैठक घेतली. या बैठकीला डॉ. विवेकानंद माने, अनिल माळी, प्रशांत गोडसे, निलेश गोडसे, धनंजय चव्हाण, रामभाऊ देवकर, सोमनाथ जाधव, वचनशेठ शहा, प्रदीप शेटे, प्रदिप खुडे असे भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

  महाराष्ट्रात १००८ मागासवर्गीय, ५०१३ इतर मागासवर्गीय समाजाची संख्या आहे. आरक्षण असूनही जातीनिहाय आरक्षणाचा अनुशेष भरला जात नाही. आता तर मराठा समाज आरक्षण मागत आहे, त्यांना ही न्यायालयात दाद मिळत नाही. त्यामुळे आता रस्त्यावरील लढा उभारला जाण्याची सुरुवात झाली आहे. याला खटाव-माण तालुक्यातील स्वाभिमानी जनता २६ जूनच्या आंदोलनाच्या माध्यमातून नक्कीच साथ देईल, असा ठाम विश्वास असल्याचे जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

  दरम्यान, या महत्वपूर्ण बैठकीत जिल्हा बँक, विविध गावच्या विकास सोसायटी, मायणी, दहिवडी, वडूज नगरपंचायत निवडणुका पूर्वतयारी, वडूज येथे जम्बो कोविड सेंटर उभारणीसाठी केलेल्या प्रयत्नांची सविस्तर माहिती देण्यात आली. या बैठकीला खटाव-माण तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.