;प्रतिकात्मक फोटो
;प्रतिकात्मक फोटो

    नागठाणे : पत्नीशी संबंध असल्याचा संशय घेऊन एकास बेदम मारहाण करण्याची घटना माजगाव फाटा (ता. सातारा) येथील स्नॅक सेंटरवर घडली. यामध्ये विवेक रामचंद्र शितोळे (वय 26, रा. मूळ पांगीरे (अ), ता. चिकोडी, जि. बेळगाव-कर्नाटक, हल्ली रा. मोशी, पुणे) हा गंभीर जखमी झाला. हल्लेखोर व जखमी दोघेही कर्नाटक राज्यातील असून, बोरगाव पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने सात जणांना ताब्यात घेतले. रविवारी सकाळी साई स्नॅक सेंटरवर ही घटना घडली असून, रात्री उशिरा बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

    याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विवेक शितोळे हा मोशी (पुणे) येथे कामास आहे. त्याचे सहा महिन्यांपूर्वी पांगीरे (अ) गावच्या निवडणुकीत गावातील एकासोबत बाचाबाची झाली होती. तसेच बाचाबाची झालेल्या संबंधिताच्या पत्नीसोबत विवेकचे संबंध असल्याचा संशय संशयित घेत होता. निवडणुकीनंतर विवेक शितोळे हा कामानिमित्त मोशी (पुणे) येथे आला होता.

    याच दरम्यान संशयिताची पत्नीही गावातून निघून गेल्याने ती विवेक शितोळे सोबत असणार असे समजून रविवारी रात्री किरण नेमा शितोळे, शिवकुमार कृष्णा कांबळे, प्रवीण बाबासो धरकार, प्रज्वल सुकुमार कांबळे, राजेंद्र देवदत्त राजहंस, सौरभ तानाजी हेडगे व संतोष शामराव भोसले (सर्व रा. मागूर, ता. निपाणी, जि. बेळगाव-कर्नाटक) हे सर्वजण मारुती ओम्नी कार घेऊन मोशी (पुणे) येथे विवेक शितोळे यांचेकडे चौकशीला आले होते. यावेळी त्यांनी पांगीरे गावी जाऊन घरच्यांसोबत चर्चा करून प्रकरण मिटवून टाकू, असे सांगून विवेक शितोळे याला घेऊन सर्वजण परत गावाकडे निघाले.

    सकाळी अकराच्या सुमारास हे सर्वजण नाष्टा करण्यासाठी माजगाव फाटा (ता. सातारा) येथील साई स्नॅक सेंटरवर थांबले. यावेळी गावी गेल्यावर हे सर्वजण आपल्याला मारतील या भीतीने विवेक शितोळे तेथून लगतच असलेल्या उसाच्या शेताकडे पळत सुटला. यावेळी इतरांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. यावेळी सर्वांनी विवेक शितोळे याला दगडाने, उसाने व हाताने मारहाण केली.

    मारहाणीची घटना स्थानिकांकडून समजताच सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सात जणांना कारसह ताब्यात घेतले. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या विवेक शितोळेला पोलिसांनी उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेचा पुढील तपास हवालदार बाबा महाडिक करत आहेत.