पोलीस पाटलांच्या मागण्यांबाबत तातडीने निर्णय घ्या; रामराजे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

  फलटण : महाराष्ट्रातील पोलिस पाटलांच्या प्रलंबीत सर्व मागण्या मंत्रिमंडळ उपसमिती समोर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याबाबत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश देतानाच विधान भवनातील बैठकीचा अहवाल समितीकडे पाठविण्याच्या सूचना महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी बैठकीतच संबंधितांना दिल्या आहेत.

  महाराष्ट्रातील पोलीस पाटलांच्या प्रलंबीत मागण्यांसंदर्भात विधान भवन, मुंबई येथील दालनात विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली  व गृह विभागाचे सचिव संजय सक्सेना, अतिरिक्त पोलीस महासंचालक संजीव सिंघल, गृह विभागाचे उपसचिव युवराज अजेटराव यांची प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटना अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हणमंतराव  सोनवलकर पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष प्रदीप गाढवे पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष साहेबराव राळे पाटील, सातारा जिल्हा सल्लागार सोमनाथ जगताप पाटील, फलटण तालुकाध्यक्ष शांताराम काळेल पाटील, उपाध्यक्ष  नंदकुमार खताळ पाटील व सुनील बोराटे पाटील, दिपक राऊत पाटील, अमोल पाचपुते पाटील, दत्तात्रय वाल्हेकर पाटील शांताराम सातकर पाटील उपस्थित होते.

  नूतनीकरणाची अटीची गरज नाही

  पोलीस पाटील हा ग्रामीण भागात कार्यरत असणारा प्रशासनाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यांना स्वसंरक्षणार्थ शस्त्र परवाना देण्याची, पोलीस पाटील नियुक्ती नूतनीकरण कायमचे बंद करण्यासंदर्भातील मागणी रास्त आहे. पोलीस पाटलांची नियुक्ती परीक्षा घेऊन केलेली असल्याने त्यांना नूतनीकरणाची अट ठेवण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करीत याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी बैठकीत दिले.

  १५ हजार रुपये मानधन करा

  पोलीस पाटलांचे मानधन वाढवून दरमहा १५ हजार रुपये करण्याची मागणी मंत्रीमंडळ उपसमिती समोर ठेवण्यात आली असून, यावर चर्चा होऊन लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन गृह विभागाचे सचिव संजय सक्सेना यांनी बैठकीत दिले. महाराष्ट्रातील ४३ पोलीस पाटील गावात कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्नशील असताना त्यांचे कोरोनामुळे निधन झाले असून, त्यापैकी ६ पोलीस पाटलांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचा विमा कवच मिळाले असून, उर्वरित पोलीस पाटलांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे विमा कवच लवकरात लवकर मंजूर करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हणमंतराव सोनवलकर पाटील यांनी बैठकीत केली.