दुहेरी खून प्रकरणातील फरार आरोपीला सहा वर्षांनंतर केली अटक

    वडूज : मागील सहा वर्षांपासून दुहेरी खुनाचा जबरी गुन्हा करून फरार असणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले. खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील पोलिस ठाणे हद्दीतील करंजओढा, बुध ता.खटाव गावामध्ये २०१५ च्या स्वातंत्र्य दिनी दिवसाढवळ्या दुहेरी खून करून फरार असलेला आरोपी रायसिंग शंकर जाधव (रा. करंजओढा बुध, ता. खटाव , जि. सातारा) यास अटक करण्यात आली.

    पोलिसांच्या या कारवाईत आरोपीस पोलादपूर येथे पोलादपूर पोलिस ठाण्याच्या मदतीने उपविभागीय पोलिस अधिकारी कोरेगाव यांच्या अधिनस्त पथकाने मोठ्या शिताफीने जेरबंद केले. ही कामगिरी उपविभागीय पोलिस अधिकारी, कोरेगाव पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल साहिल झारी व पोलीस कॉन्स्टेबल हेमंत शिंदे यांनी केली. या गुन्ह्यातील अकरा आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. फरार आरोपी रायसिंग जाधव हा गेल्या सहा वर्षांपासून वारंवार ठिकाणे बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. त्याच्या शिताफीने पकडण्यास पोलिस प्रशासनास यश आले.

    या प्रकरणातील फरार आरोपीला जेरबंद करण्यासाठी गेलेल्या पथकाच्या यशस्वी कामगिरीबद्दल साताऱ्याचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय अधिकारी गणेश किंद्रे व पुसेगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय बोंबले यांनी या पथकाचे विशेष कौतुक केले.