कराडची प्रशासकीय इमारत कोरोनाच्या विळख्यात ; तहसीलदार विजय पवार यांच्यासह नायब तहसीलदारही कोरोनाबाधित

तहसीलदार कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर नगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राच्यावतीने तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यात नायब तहसीलदार आनंदराव देवकर यांचीही टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आली.

  कराड: कराड तालुक्यात व शहरात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. गेल्या चार दिवसात मोठ्या संख्येने बाधित आढळून आले आहेत. यामध्ये कराडचे तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार आनंद देवकर यांचा ही कोरोना अहवाल बाधित आल्याने प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालयात सर्वांची चांगलीच धावपळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरी आरोग्य केंद्राच्यावतीने कार्यालयातील सर्व कर्मचारी अधिकारी यांची कोरोना चाचणी करण्यास प्रारंभ केला असून अन्य सहा कर्मचारी बाधित असल्याची माहिती समोर आली आहे.

  सध्या शहरात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निर्बंध लावले असून नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. कराडचे तहसीलदार विजय पवार यांचा कोरोना अहवाल बाधित आल्याने त्यांनी तात्काळ उपचार सुरू केले आहेत.

  तहसीलदार कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर नगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राच्यावतीने तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यात नायब तहसीलदार आनंदराव देवकर यांचीही टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आली. तसेच त्यांच्यासह तहसील व प्रांत कार्यालयातील मोरे, संकपाळ, संतोष गुलाणी आदींसह अन्य ३ कर्मचाऱ्यांची टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे तहसील व प्रांत कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.

  संपूर्ण कार्यालयाचे निर्जंतुकीकरण….
  नगरपालिकेचे नागरी आरोग्य केंद्र व आरोग्य विभागाच्यावतीने तहसील व प्रांत कार्यालय पूर्णपणे सॅनीटराईज करण्यात आले आहे. तसेच या दोन्ही कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही कोरोना टेस्ट करण्याचे काम सुरु आहे. त्याचबरोबर कराड, मलकापूरसह तालुक्यात वाढत्या कोरोना पॉझिटिव्ह रेटच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध लावले असून नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सुचनाही नगरपालिका व पोलीस प्रशासनाने दिल्या आहेत.

  तहसील कार्यालय तसेच तालुक्यातील नागरिकांनी कोरोना नियमांचे व प्रशासनाच्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करावे, आरोग्याबाबत थोडी जरी शंका आल्यास संबंधितांनी तात्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व प्रशासनाचे नियम पाळून सहकार्य करावे.

  - विजय पवार, तहसीलदार, कराड