नांदगावचा पूल बनला धोकादायक ; बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

कराड दक्षिण विभागाला अतिवृष्टीचा दणका बसला. येथील दक्षिण मांड नदीला आलेल्या महापूरात विभागातील काले, नांदगाव, ओंड, उंडाळे परिसरातील नदीकाठच्या गावांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये शेत जमीन, पिकांची तसेच दक्षिण मांड नदीवरील बहुतांशी पुलांची दुरवस्था झाली आहे. या नुकसानीची बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींनीही पाहणी केली. यात नांदगाव येथील पुलाचाही समावेश होता. परंतु, अद्यापही या पुलाची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे धोकादायक बनला आहे.

  कराड : नांदगाव, ता. कराड येथे दक्षिण मांड नदीवरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. नुकत्याच आलेल्या महापुराचा या पुलाला फटका बसला असून पुलाच्या दोन्ही बाजूकडील लोखंडी रेलिंग तुटून गेले आहेत. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे धोकादायक बनला आहे. स्थानिकांना या पुलावरून रात्री-अपरात्री प्रवास करताना अक्षरशः जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होत आहे.

  कराड दक्षिण विभागाला अतिवृष्टीचा दणका बसला. येथील दक्षिण मांड नदीला आलेल्या महापूरात विभागातील काले, नांदगाव, ओंड, उंडाळे परिसरातील नदीकाठच्या गावांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये शेत जमीन, पिकांची तसेच दक्षिण मांड नदीवरील बहुतांशी पुलांची दुरवस्था झाली आहे. या नुकसानीची बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींनीही पाहणी केली. यात नांदगाव येथील पुलाचाही समावेश होता. परंतु, अद्यापही या पुलाची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे धोकादायक बनला आहे.

  नांदगाव पुलावरून नांदगावसह मनव, खुडेवाडी, साळशिरंबे, महारुगडेवाडी, जिंती या गावांची वाहतूक होते. त्यातील साळशिरंबे, महारुगडेवाडी व जिंतीला उंडाळेमार्गे पर्यायी मार्ग असल्याने पुलाअभावी या गावांच्या दळणवळणाचा तितकासा प्रश्न उद्भवत नाही. मात्र, नांदगाव व मनव आणि खुडेवाडीला हाच जवळचा व सोयीस्कर मार्ग असल्याने या पुलावरूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. तसेच याच पुलावरून कराड-जिंती बसही जाते. खासगी वाहतुकही मोठ्या प्रमाणावर सुरु असते.

  दुर्घटनेची मोठी शक्यता…
  कराड-चांदोली रस्त्यावरून नांदगावला जाताना दक्षिण मांड नदीवर हा पूल लागतो. या पुलाकडे जाताना तीव्र उतार व धोकादायक वळण असून नांदगावमधून कराड-चांदोली रस्त्याकडे येतानाही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे या पुलावरून प्रवास करताना दुचाकी धारकांना मोठी कसतर करावी लागते. रात्री-अपरात्री दुचाकीवरून प्रवास करताना एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

  दुर्घटनेची जबाबदारी बांधकाम विभाग घेणार?
  नांदगाव पुलाच्या दोन्ही बाजूकडील लोखंडी रेलिंगसह आरसीसी सुरक्षा कठडेही पुराच्या पाण्यामुळे तुटून गेले आहे. हा पूल वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला असताना सुरक्षेच्या दृष्टीने बांधकाम विभागाने कोणतीही काळजी घेतलेली नाही. त्यामुळे सुरक्षेच्या अभावी दुर्घटना घडल्यास याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग घेणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

  प्रशासनासह लोकप्रतिनिधीही बेजबाबदार
  कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी अतिवृष्टीनंतर विभागाची पाहणी केली. मदतीचे आश्वासन दिले. परंतु, हा निव्वळ आश्वासनाचा फार्स असल्याचेच नांदगावच्या पुलाची अवस्था पाहिल्यानंतर दिसून येते. अतिवृष्टीला महिन्याभराचा कालावधी उलटून गेलातरी क्षतीग्रस्त असलेल्या नांदगाव पुलाला सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही काळजी घेण्यात आलेली नसल्याने प्रशासनासह येथील लोकप्रतिनिधीही बेजबाबदार वागत असल्याची चर्चा कराड दक्षिणेत आहे.