कृष्णा हॉस्पिटलच्या कार्याचे देशाने अनुकरण करावे : नितीन गडकरी

  कराड : गेल्या दीड वर्षात कोरोना काळात संपूर्ण देश मोठ्या संकटातून गेला. पण अशा कठीण परिस्थितीत कृष्णा हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ यांच्यापासून अगदी सिक्युरिटी गार्डनी आपला जीव धोक्यात घालून हजारो रूग्णांचे प्राण वाचविले. कोरोनाकाळात कृष्णा हॉस्पिटलने दिलेले योगदान उल्लेखनीय असून, या कार्याचे देशाने अनुकरण करावे, असे गौरवोद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काढले.

  कृष्णा हॉस्पिटलमध्ये आयोजित कोरोना योद्ध्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, प्रशांत परिचारक, माजी आमदार आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिणगारे, भाजपाचे नेते मकरंद देशपांडे, महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर होते.

  नितीन गडकरी म्हणाले, कोविड काळात देशाला अनेक संकटांचा सामना करावा लागला. त्याकाळात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यांची सर्वत्र कमतरता भासत होती. औषधांचाही तुटवडा होता. बेडची कमतरता भासत होती. अशा कठीण परिस्थितीत डॉक्टर्स, नर्सेस यांनी आपला जीव धोक्यात घालून, मानवतेचे कार्य कृतीतून करून दाखविले. या सगळ्यांच्या कष्टाचे मनापासून अभिनंदन आहे.

  कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टसारख्या संस्थांनी कोरोना काळात दिलेले योगदान ऐतिहासिक आहे. किंबहुना सरकारी व्यवस्थेला जे शक्य झाले नाही, त्यापेक्षा जास्त सेवा या संस्थांनी दिल्या आहेत. सद्य:स्थितीला देशात ६०० मेडिकल कॉलेज, ‘एम्स’सारख्या ५० वैद्यकीय संस्था आणि २०० सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची ताबडतोब आवश्यकता आहे. देशात डॉक्टरांचीही कमतरता आहे. या सगळ्या कामात आता सरकारसोबत सहकारी, सामाजिक, शैक्षणित क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

  यावेळी डॉ. सुरेश भोसले यांनी कृष्णा हॉस्पिटलने कोरोनाकाळात केलेल्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेतला. ते म्हणाले, कोरोनाच्या प्रारंभीपासून अद्ययावत कोरोना वॉर्डची निर्मिती, कोविड-१९ ची तपासणी करणाऱ्या जिल्ह्यातील पहिल्या प्रयोगशाळेची उभारणी, प्लाझ्मा उपचाराचा अवलंब यामुळे कृष्णा हॉस्पिटलला कोरोनाचे हजारो रूग्ण मोफत बरे करण्यात यश आले. कोरोना काळात ३६० कोरोना पॉझिटिव्ह गरोदर महिला योग्य उपचाराने कोरोनामुक्त झाल्या. ६००० पेक्षा जास्त प्रसुती या काळात कृष्णा हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे पार पडल्या.

  अगदी नवजात बालकापासून ते १०० वर्षांच्या वयावृद्ध व्यक्तीलाही कोरोनामुक्त करण्यात कृष्णा हॉस्पिटलने यश प्राप्त केले असून, जिल्ह्यात केवळ येथेच म्युकरमायकोसिसवर उपचार केले जातात. आजही कोरोना वॉर्डमध्ये अनेक रूग्णांवर योग्य उपचार सुरू असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.

  यावेळी कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे यांनी स्वागत केले. आभार डॉ. अतुल भोसले यांनी मानले. याप्रसंगी कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका उत्तरा भोसले, विनायक भोसले, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, जि.प. सदस्य शामबाला घोडके, प्रियांका ठावरे, संचालक धोंडीराम जाधव, दयानंद पाटील, निवासराव थोरात, श्रीरंग देसाई, दत्तात्रय देसाई, भाजपाचे तालुकाध्यक्ष पैलवान धनाजी पाटील यांच्यासह कृष्णा विद्यापीठ व हॉस्पिटलमधील अधिकारी, कर्मचारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

  कोरोना योद्ध्यांचा सन्मान..

  गडकरी यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला. यामध्ये कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक व कोविड-१९ टास्क फोर्स कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. ए. वाय. क्षीरसागर, सहाय्यक कार्यकारी अध्यक्ष डॉ. संजयकुमार पाटील, मेडिसीन विभागप्रमुख डॉ. व्ही. सी. पाटील, डॉ. अपर्णा पतंगे, डॉ. अमोल गौतम, डॉ. अर्चना गौतम, चिफ नर्सिंग ऑफिसर सौ. रोहिणी बाबर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, वरिष्ठ संशोधन अधिकारी डॉ. कैलास दातखिळे, नम्रता देसाई, निखिल पाटील, डॉ. सुशील घार्गे यांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

  कृष्णा हॉस्पिटल नसते तर पेशंट कुठे गेले असते?

  कृष्णा हॉस्पिटलच्या कामाचे कौतुक करताना नितीन गडकरी म्हणाले, की आत्मनिर्भर भारतासाठी कृष्णा समूह देत असलेले योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे. गरीब लोकांची काळजी घेण्यासाठी कृष्णा हॉस्पिटलच्या रूपाने तयार केलेले हे मॉडेल आदर्शवत असून, कोरोना काळात कृष्णा हॉस्पिटल पुढे आले नसते, तर या भागातील पेशंट कुठे गेले असते? आणि त्यांची अवस्था काय झाली असती? याचा विचारही करवत नाही.

  डॉ. भोसलेंच्या नेतृत्वाखाली साखर कारखानदारी उत्तम

  इथेनॉल निर्मितीला प्राधान्य देण्याचे आवाहन मी सातत्याने करत आलो आहे. मला आनंद आहे, की डॉ. भोसलेंच्या नेतृत्वाखाली साखर कारखानदारी उत्तम सुरू असून, त्यांनी इथेनॉल निर्मितीला अधिकाधिक प्राधान्य देण्याचे धोरण आखलेले आहे; जे कारखान्याच्या व शेतकरी सभासदांच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे.