सशस्त्र दरोड्यातील टोळी सातारा एलसीबीच्या जाळ्यात ; मसूर, वडूज, पुसेसावळी दरोड्याच्या तपासाला मिळणार गती

मसूर, ता. कराडसह वडूज, पुसेसवळी येथे पडलेल्या सशस्त्र दरोड्याप्रकरणी सहा जणांना सातारा गुन्हे अन्वेषण विभागाने अहमदनगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले. याप्रकरणी सपोनि रमेश गर्जे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तपासकार्यात सक्रीय होते. सहा पारध्यांची टोळी अतिशय कल्पक तपास यंत्रणा राबवून ताब्यात घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली

    उंब्रज : मसूर, ता. कराडसह वडूज, पुसेसवळी येथे पडलेल्या सशस्त्र दरोड्याप्रकरणी सहा जणांना सातारा गुन्हे अन्वेषण विभागाने अहमदनगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले. याप्रकरणी सपोनि रमेश गर्जे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तपासकार्यात सक्रीय होते. सहा पारध्यांची टोळी अतिशय कल्पक तपास यंत्रणा राबवून ताब्यात घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    कोणताही सबळ पुरावा हाती नसताना निव्वळ तांत्रिक माहितीच्या आधारे सपोनि रमेश गर्जे यांनी निवडक पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुतावरून स्वर्ग गाठत दोन जिल्हे पार करीत पर जिल्ह्यातील स्थानिक पोलिसांच्या मदतीने मध्यरात्रीच्या सुमारास संशयित चोरट्यांवर झडप घातली. एकाचवेळी तीन ठिकाणी कारवाई करीत अट्टल दरोडेखोर ताब्यात घेतले. या कारवाईमुळे मसूर,पुसेसावळी व वडूज येथील गुन्हे उकलण्यासाठी मदत होणार आहे.

    दरम्यान, एका कारवाई प्रकरणी पाठलाग करीत असताना एक मोटारसायकल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला सापडली. आणि संशयित आरोपी संदर्भात धागेदोरे जुळत गेले. या तपासकामी वडुजचे सपोनि मालोजीराव देशमुख यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली.

    ही कारवाई सातारा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल,सहाय्यक पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.