एकतर्फी प्रेमातून युवतीचा खून ; चाफळ येथील घटना, संशयित पोलिसांच्या ताब्यात

चाफळ येथे एका भाड्याच्या घरात एक शिक्षिका त्यांच्या कुटुंबीयांसमवेत राहण्यास आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी सदरची शिक्षिका चाहूरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत त्यांच्या दुसऱ्या मुलीला घेऊन गेल्या होत्या. तर मयत मुलीचे वडील त्यांच्या मूळ गावी वाठार किरोली येथे सकाळी गेले होते. त्यामुळे घरात मयत युवती एकटीच होती. यावेळी संशयित युवक सदर मुलीच्या घरी आला होता. या दरम्यान,संशियत युवकाने चाकूने सदर युवतीचा गळा निर्घृणपणे चिरून शरीरावर वार केले.

    कराड: चाफळ ता.पाटण येथे एकतर्फी प्रेमातून एका युवतीचा २० वर्षीय युवकाने भर दिवसा चाकूने गळ्यावर वार करून निर्घृण खून केल्याची घटना गुरुवार दि.२३ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेमुळे चाफळसह परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, पोलिसांनी संशयित युवकाला ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

    चैतन्या बाळू बंडलकर सध्या रा.चाफळ ता.पाटण मुळ गाव रा.वाठार किरोली ता.कोरेगांव असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे. तर अनिकेत अरविंद मोरे (वय२०) रा.शिरंबे ता. कोरेगाव असे खून प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित युवकाचे नाव आहे.

    याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, चाफळ येथे एका भाड्याच्या घरात एक शिक्षिका त्यांच्या कुटुंबीयांसमवेत राहण्यास आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी सदरची शिक्षिका चाहूरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत त्यांच्या दुसऱ्या मुलीला घेऊन गेल्या होत्या. तर मयत मुलीचे वडील त्यांच्या मूळ गावी वाठार किरोली येथे सकाळी गेले होते. त्यामुळे घरात मयत युवती एकटीच होती. यावेळी संशयित युवक सदर मुलीच्या घरी आला होता. या दरम्यान,संशियत युवकाने चाकूने सदर युवतीचा गळा निर्घृणपणे चिरून शरीरावर वार केले. यामध्ये युवतीचा जागीच मृत्यू झाला. काही वेळातच संशयिताने मल्हारपेठ पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. संशयिताला मल्हारपेठ पोलिसांनी ताब्यात घेऊन घटनास्थळ गाठले. घटनास्थळी पोलिसांना सदरची युवती रक्ताच्या थारोळ्यात मिळून आली. या दरम्यान संशयिताने घडलेला प्रकार पोलिसांना सांगून खून केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. रणजित पाटील, पोलिस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी भेट देऊन मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सपोनि उत्तम भापकर, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांना मार्गदर्शन केले. सदर घटनेची नोंद करण्याचे कामरात्री उशिरापर्यंत मल्हारपेठ पोलिस ठाण्यात सुरू होते.