निकाल गुलदस्त्यात; अतिउत्साही कार्यकर्ते मात्र जोमात , गोळेश्वर येथे झळकला आणि काढलाही विजयी फ्लेक्स

जिल्ह्यात कराड सोसायटी मतदारसंघ संघाची निवडणूक उत्सुकतेचा विषय आहे. या मतदारसंघातील लढत भविष्यातील अनेक निवडणुकांना दिशादर्शक ठरणार आहे.सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि उदयसिंह पाटील-उंडाळकर गटातील कार्यकर्त्यांमध्ये निकालाची चांगलीच उत्सुकता वाढली आहे.

    कराड : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत कराड सोसायटी मतदारसंघात हाय वोल्टेज लढत आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विरुद्ध उदयसिंह पाटील यांच्यातील झालेल्या चुरशीच्या लढाईत शंभर टक्के मतदान झाले आहे. निकालाची उत्सुकता ताणली गेली असताना निकालाच्या पूर्वसंध्येला अचानकच कराड तालुक्यातील गोळेश्वर गावात बाळासाहेबांच्या विजयाचा फ्लेक्स झाळकला. आणि तो काही काळातच पुन्हा आणि लगबगीने काढण्यात आला. हे दोन्ही फोटो सोशल मीडियावर चांगलेच वायरल झाल्याने उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

    जिल्हा बँक निवडणुकीची बुधवारी मतमोजणी होत आहे. जिल्ह्यात कराड सोसायटी मतदारसंघ संघाची निवडणूक उत्सुकतेचा विषय आहे. या मतदारसंघातील लढत भविष्यातील अनेक निवडणुकांना दिशादर्शक ठरणार आहे.सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि उदयसिंह पाटील-उंडाळकर गटातील कार्यकर्त्यांमध्ये निकालाची चांगलीच उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, निकालाच्या पूर्व संध्येला गोळेश्वरमध्ये सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा फ्लेक्स झळकावला. मात्र, काही अवधीतच लगबगीने तो काढूनही घेतला. दरम्यान, दोन्ही गटांनी विजयाचा दावा केला आहे.परंतु विजयाचा ठाम विश्वास दर्शवत तत्परतेने पालकमंत्र्यांच्या विजयाचा फ्लेक्स झळकावला. या फ्लेक्सवर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासोबत भाजचे प्रदेश सदस्य अतुल भोसले यांचाही फोटो असल्याने चर्चेला उधाण आले. परंतु, काही अवधीतच तेवढ्याच लगबगीने कार्यकर्त्यांनी तोच फलक काढूनही घेतला. या प्रकाराने तालुक्यासह जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा सुरू झाली. सोशल माध्यमांवरही सदरचे दोन्ही फोटोही चांगलेच व्हायरल झाले आहेत.