सातारा: दुष्काळी माण तालुक्यातील मेंढपाळाच्या मुलाने लावला लघुग्रहाचा शोध; नासाने घेतली शोधमोहिमेची दखल

नासा, पॅन स्टार्स, कॅटालिना स्काय सर्व्हे आणि हर्डिन सिमन्स युनिव्हर्सिटी टेक्सास यांच्याकडून 1 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर दरम्यानच्या कालावधीत घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध मोहिमेमध्ये 'खगोल भूगोल वेद आणि विज्ञान' या त्यांच्या टीमकडून एका नवीन लघु ग्रहाचा शोध नोंदवण्यात आला. विनायक व त्यांच्या टीमने प्राथमिक अवस्थेत शोधलेल्या या ग्रहाला (P11K6CL) सध्या KBV0001 असे नाव देण्यात आले असून त्याची नोंद नासाकडे करण्यात आली आहे.

    सातारा :  अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने (नासा) सुरू केलेल्या आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध मोहिमेत साताऱ्यातील विनायक दोलताडे यांनी एका लघुग्रहाचा शोध लावून गगन भरारी घेतली आहे. विनायक दोलताडे हे सातारा जिल्ह्यामधील दुष्काळी माण तालुक्यातील माळवाडी गावातील आहेत.

    त्यांना विद्यार्थी दशेत असतानापासूनच अवकाश निरीक्षणाची आवड होती. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अवकाशातील ग्रह शोध बारकाव्याने निरीक्षण सुरू ठेवले. नासाने सुरू केलेल्या आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध मोहिमेमध्ये विनायक दोलताडे यांना अवकाशातील एका लघुग्रहाचा शोध लावण्यात त्यांना यश मिळविले आहे.

    नासा, पॅन स्टार्स, कॅटालिना स्काय सर्व्हे आणि हर्डिन सिमन्स युनिव्हर्सिटी टेक्सास यांच्याकडून 1 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर दरम्यानच्या कालावधीत घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध मोहिमेमध्ये ‘खगोल भूगोल वेद आणि विज्ञान’ या त्यांच्या टीमकडून एका नवीन लघु ग्रहाचा शोध नोंदवण्यात आला. विनायक व त्यांच्या टीमने प्राथमिक अवस्थेत शोधलेल्या या ग्रहाला (P11K6CL) सध्या KBV0001 असे नाव देण्यात आले असून त्याची नोंद नासाकडे करण्यात आली आहे.

    तीन ते पाच वर्षे त्याच्या स्थितीचे व हालचालींचे निरीक्षण घेऊन त्याचा समावेश नासाच्या खगोलीय घटकांच्या यादीमध्ये करण्यात येणार आहे. या टीमचे प्रमुख विनायक हे एका मेंढपाळाचे सुपूत्र असून त्यांचे प्राथमिक शिक्षण माण तालुक्यातील रांजणी येथे तर माध्यमिक शिक्षण सिद्धनाथ हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज म्हसवड येथील माळवाडी येथे झाले आहे.