लोणंद येथे रेल्वेच्या धडकेत पिता-पुत्राचा दुर्दैवी अंत

लोणंद रेल्वे स्टेशननजीक रेल्वेच्या धडकेत (Accident in Satara) अंदोरी ता. खंडाळा येथील एसआरपीमध्ये कार्यरत असणारे शैलेश बोडके आणि त्यांचा एक वर्षाचा मुलगा रुद्र बोडके यांसह दुर्दैवी अंत झाला.

    सातारा : लोणंद रेल्वे स्टेशननजीक रेल्वेच्या धडकेत (Accident in Satara) अंदोरी ता. खंडाळा येथील एसआरपीमध्ये कार्यरत असणारे शैलेश बोडके आणि त्यांचा एक वर्षाचा मुलगा रुद्र बोडके यांसह दुर्दैवी अंत झाला. पुणे-मिरज मार्गावरील लोणंद रेल्वे स्टेशननजीक रविवारी सायंकाळी बेंगलोर-जोधपूर एक्स्प्रेस रेल्वे (गाडी नंबर ०६५०६) या रेल्वेच्या धडकेमध्ये अंदोरी येथील एसआरपीमध्ये कार्यरत असलेले शैलेश ज्ञानेश्वर बोडके (वय-२८) आणि त्यांचा एक वर्षाचा मुलगा रुद्र बोडके याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

    या घटनेची नोंद सातारा रेल्वे पोलिस स्टेशनला करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या घटनेबाबत रेल्वे पोलिसांकडून आणि घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, अंदोरी ता. खंडाळा येथील शैलेश बोडके हे एसआरपीमध्ये धुळे या ठिकाणी नोकरीस आहेत. त्यांची पत्नी मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. शैलेश बोडके हा आपल्या मुलासह सुट्टी घेऊन दोन दिवसांपूर्वी अंदोरी येथे घरी आला होता.

    शैलेश बोडके हे आपल्या एक वर्षाच्या मुलासह रविवारी सायंकाळी लोणंद रेल्वे स्टेशनवर गेले असता बेंगलोर-जोधपूर एक्स्प्रेस या रेल्वेच्या धडकेमध्ये त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही. आर. पाटोळे, आदिनाथ भोसले व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेचा पंचनामा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या घटनेत बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने अंदोरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.