…तर राजकारणातून संन्यास घेईन : मदन भोसले

    सातारा : ज्यावेळी किसनवीर कारखाना सुरळीत चालू होता. त्यावेळी प्रतापगड कारखाना काही मंडळी खासगीमध्ये खरेदी करायला गेली. प्रतापगडच्या स्थानिक व्यवस्थापनाकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मध्यस्थीकरवी कारखाना घ्यायला विनंती केली. 16 वर्षाच्या करारावर हा कारखाना घेतला. परंतु तेथील स्थानिक प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे कारखाना अडचणीत आला. त्यांना जर कारखाना परत हवा असेल तर तेवढे पैसे कारखाना परत द्यायला तयार आहे.

    दरम्यान, कारखान्यावर हजार कोटींचे कर्ज आहे, असे जे सांगतात त्यांनी सव्वातीनशे कोटींच्या वर एक रुपयांचे कर्ज दाखवावे, तसे आढळून आले तर राजकीय, सामाजिक जीवनातून संन्यास घेईन, असे आव्हान किसनवीर कारखान्याचे चेअरमन मदन भोसले (Madan Bhosale) यांनी विरोधकांना दिले.

    साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भोसले म्हणाले, किसनवीर कारखान्याने उभारीच्या काळात शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. एफआरपीपूर्वी एसएमपी होती. त्यानुसार शेतकऱ्यांना 405 कोटी रुपये वाटणारा किसनवीर एकमेव कारखाना होता. अनेक उपक्रम उभे केले. मात्र, गेल्या तीन वर्षापासून कारखाना अडचणींचा सामना करत आहे. हेच दिवस राहत नाहीत. याचवर्षी किसनवीरने एफआरपी पूर्ण दिली नाही.

    मध्यंतरी काही मंडळींनी कारखान्यावर आठशे ते हजार कोटींचे कर्ज आहे, अशी अफवा उठवली. कारखान्याची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अशा अफवा उठवणाऱ्या मंडळींनी हजार कोटींचे कर्ज असल्याचे दाखवून द्यावे, मी राजकीय आणि सामाजिक जीवनातून संन्यास घेईन, असे आव्हान भोसले यांनी विरोधकांना यावेळी दिले.