fraud

सातारा : लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने वाई (ता. वाई) येथील दोन भावडांची ३ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक झाली असल्याची फिर्याद प्रदीप चित्राव तरडे (रा. वाई, ता. वाई) यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी अक्काईचीवाडी येथील एकासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने वाई (ता. वाई) येथील दोन भावडांची ३ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक झाली असल्याची फिर्याद प्रदीप चित्राव तरडे (रा. वाई, ता. वाई) यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी अक्काईचीवाडी येथील एकासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रदीप तरडे यांचे पुतणे श्रीकांत दीपक तरडे व श्रीधर दीपक तरडे (वय २०) ही दोन्हीही सख्खी जुळी भावंडे डिप्लोमा इंजिनिअरिंग करत असून ते लष्करात भरती होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रदीप तरडे यांच्या ओळखीचे दिलीप कुंभार (रा. वाई) यांनी मुलांना भरती करण्यासाठी दादासाहेब रामचंद्र चिकाटे (रा. आक्काईचीवाडी, ता. कराड) यांची ओळख करून दिली. तेव्हा दादासाहेब चिकाटे यांनी दोन्ही मुलांना नोकरीस लावण्यासाठी ६ लाख रुपये द्यावे लागतील, कोल्हापूर येथे सदानंद बाणे यांना भेटायला जावे लागेल, असे सांगितले. तेव्हा सदानंद बाणे (रा. कोल्हापूर) यांना भेटायला गेले असता त्यांनी तुमच्या दोन्ही पुतण्याचे काम करतो, असे सांगितले. त्यासाठी अॅडव्हान्स म्हणून येथे सदानंद बाणे व दादासाहेब चिकाटे यांना पाचवड फाटा येथे एप्रिल २०१९मध्ये २ लाख रुपये रोख दिले. त्यानंतर जुलै २०१९ मध्ये सदानंद बाणे यांनी पुतण्याचे जॉईनिंग लेटर त्याच्या मोबाईलमध्ये दाखविले व त्यावेळी ३ लाख रुपयांची मागणी केली. चार दिवसानंतर उंब्रज (ता. कराड) येथे दादासाहेब चिकाटे व सदानंद बाणे यांना रोख २ लाख रुपये दिले. २८ ऑगस्ट २०१९ रोजी दादासाहेब चिकाटे यांच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या सेव्हिंग खात्यावर १ लाख रुपये भरले. त्यानंतर ११ नोव्हेंबर २०१९ रोजी हैद्राबाद सिकंदराबाद येथील आर्मी सेंटरला रिपोर्टिंग करण्यासाठी हजर रहा, असे सांगून माझा एक माणूस सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवर तुमच्या पुतण्यांना नेण्यास येईल, असे बाणे व चिकाटे यांनी सांगितले. त्यानुसार त्या ठिकाणी तरडे पुतण्यांसह खासगी वाहनाने गेले असता ती व्यक्ती रेल्वे स्टेशनवर आली नाही. त्यानंतर तेव्हा बाणे, चिकाटे यांना फोन केला असता त्यांनी अजून दोन दिवस थांबा. आमचा माणूस येईल, असे सांगितले. परंतु, त्या ठिकाणी तरडे तीन दिवस वाट बघून परत वाई येथे आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रदीप चित्राव तरडे यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानूसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.