घनकचरा व्यवस्थानात काम करणाऱ्या १०० पेक्षा जास्त स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

    महाबळेश्वर : हिलदारी अभियानाअंतर्गत महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद, संयुक्त वन व्यवस्थापन महासमिती व ग्रामपंचायत भौसे येथील घनकचरा व्यवस्थानात काम करणारे १०० पेक्षा अधिक स्वच्छता कर्मचाऱ्यांना येथील हिरडा विश्रामगृह व पंचायत समितीच्या सभागृहात तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले.

    घनकचरा व्यवस्थापनात काम करणारे कर्मचारी यांचे शिक्षण कमी झालेले असते. त्यामुळे त्यांना कचरा कसा गोळा करायचा व त्यावेळी कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे, याबाबत माहिती नसते. त्यामुळे त्यांनी केलेल्या चुकांमुळे संपुर्ण कुटुंबाला सफर व्हावे लागते म्हणून अशा कर्मचाऱ्यांना जर प्रशिक्षण दिले तर ते आपल्या आरोग्याची नक्कीच खबरदारी घेतील. यासाठी हिलदारी या संस्थेच्या वतीने स्वच्छता विभागात काम करणारे कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाची सोय करण्यात आली होती.

    पंचायत समितीच्या सभागृहात दोन दिवस व हिरडा विश्रामगृह येथे दोन दिवस हे प्रशिक्षण देण्यात आले. पुण्याचे प्रसिध्द इम्युनोलाॅजिस्ट व संशोधक डाॅ. विनिता बाळ या गेल्या ४० वर्षांपासून घनकचरा व्यवस्थापनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहेत. कचरा कसा हाताळायचा, कचऱ्याचे प्रकार कोणते, घातक कचरा हाताळताना कोणती खबरदारी घ्यायची, कोरोना महामारीचा मुकाबला कसा करायचा, कोरोना प्रतिबंधक लसींचे महत्व व त्याबाबतचे गैरसमज याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी आपल्या अडचणी विचारून आपल्या शंकाचे निरसन करून घेतले.