बदली पुण्यात…काम साताऱ्यात ; मुख्याधिकाऱ्यांची अभिजीत बापट यांच्या माघारीसाठी मोर्चेबांधणी

मुख्याधिकारी अभिजीत बापट यांचे राजकीय सख्य आणि प्रशासनातील नेटवर्क उत्तम असल्याने त्यांना पदोन्नतीनंतर साताऱ्यात माघारी आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी राजकीय मोर्चेबांधणी सुरू असून नगरविकास विभागाकडे पुन्हा आग्रह धरला जाणार असल्याची चर्चा आहे.

  आनंद कदम , सातारा : सातारा पालिकेचे मुख्याधिकारी आणि जिल्हा प्रशासन अधिकाऱ्याचा अतिरिक्त कारभार असलेले अभिजीत बापट यांची पदोन्नतीने पिंपरी चिंचवड पालिकेचे उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. मात्र अद्याप बदली अधिकारी उपलब्ध न झाल्याने बापट अद्याप साताऱ्यातच अडकून पडले आहेत. मात्र पुन्हा पुण्यावरून बापटांच्या साताऱ्यातील बदलीसाठी मोठी राजकीय फील्डिंग लागल्याचे खात्रीलायक वृत्त आहे .

  नगरविकास विभागाने शुक्रवारी (दि. १८)  राज्यातील सतरा मुख्याधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये सातारा पालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची पदोन्नतीने पिंपरी चिंचवड येथे उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा प्रकल्प संचालक पदाचा भारही बापट यांच्याकडे असत्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांना अद्याप कार्यमुक्त केलेले नाही. बदली आदेश प्राप्त होऊन आता चार दिवस उलटले तरी बदली अधिकारी उपलब्ध न झाल्याने अभिजीत बापट साताऱ्यातच अडकून पडले आहेत. त्याच पध्दतीने पुणे जिल्ह्यातील भोर पालिकेचे मुख्याधिकारी विजय थोरात यांची सातारा पालिका मुख्याधिकारी म्हणून बदली झाली आहे, मात्र त्यांनाही पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने कार्यमुक्त न केल्याने ते सुद्धा साताऱ्यात हजर होऊ शकले नाही .

  गोपनीय बैठका, राजकीय मोर्चेबांधणी
  मुख्याधिकारी अभिजीत बापट यांचे राजकीय सख्य आणि प्रशासनातील नेटवर्क उत्तम असल्याने त्यांना पदोन्नतीनंतर साताऱ्यात माघारी आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी राजकीय मोर्चेबांधणी सुरू असून नगरविकास विभागाकडे पुन्हा आग्रह धरला जाणार असल्याची चर्चा आहे. १०१२-१६ या दरम्यान आधी जिल्हा प्रकल्प संचालक, नंतर सातारा मुख्याधिकारी असे काम करणाऱ्या बापट यांची या दोन्ही पदावरची ही दुसरी प्रशासकीय इनिंग आहे.

  बदलीत राजकीय लॉबीचा हात
  बापट यांची सोलापूरवरून साताऱ्यात बदली घडवून आणण्यात साताऱ्यातील राजकीय लॉबीचा मोठा हात होता. त्यामुळे तत्कालीन मुख्याधिकारी रंजना गगे यांची साताऱ्यातून पुणे महानगरपालिकेत अवघ्या महिनाभरात बदली करण्यात आली होती. साताऱ्यात भुयारी गटार योजना, कास धरण उंची, पंतप्रधान आवास योजना या महत्वाकांक्षी योजनांची कामे सुरू आहेत. या योजनांच्या बहुतांश प्रशासकीय मान्यतांचे प्राथमिक प्रस्ताव बापट यांच्याच सहीने वरिष्ठ कार्यालयाला गेले आहेत. त्यामुळे उत्तम नेटवर्क आणि कामाचा झपाटा आणि महत्वाचे साताऱ्यातील दोन्ही राजांशी उत्तम समन्वय साधणाऱ्या बापट यांच्या घरवापसीसाठी इच्छुकांनी देव पाण्यात घातल्याचे वृत्त आहे.

  बदलीचे कार्यादेश प्राप्त झाले असले तरी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रकल्प संचालक पदासाठी बदली अधिकारी उपलब्ध झालेला नाही. जिल्हाधिकाऱ्यांचा पुढील आदेश येईपर्यंत माझे प्रकल्प संचालक या पदावरून साताऱ्यातील काम सुरूच राहणार आहे .

  -अभिजीत बापट, जिल्हा प्रकल्प संचालक, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा