दोन परदेशी नागरीक कराड पोलिसांच्या ताब्यात ; एटीएममध्ये घुसून संशयास्पद कृत्य

मलकापूर येथे एका राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएममध्ये रविवारी सायंकाळी दोन परदेशी नागरीक गेले. एटीएमचा सुरक्षारक्षक त्यावेळी बाहेर उभा होता. एटीएममध्ये गेल्यानंतर संबंधित दोघांनी वारंवार वेगवेगळी एटीएम वापरुन पैसे काढण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास आला.

    कराड : बँकेच्या एटीएममध्ये घुसून संशयास्पद कृत्य करणार्‍या दोन परदेशी नागरीकांना कराड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रविवारी सायंकाळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता पोलिसांना त्यांच्याकडे तब्बल सत्तर बनावट एटीएम कार्ड आढळली आहेत. संबंधित नागरीक रोमानिआ देशातील असल्याची प्राथमिक माहिती चौकशीतून समोर आली आहे.

    मलकापूर येथे एका राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएममध्ये रविवारी सायंकाळी दोन परदेशी नागरीक गेले. एटीएमचा सुरक्षारक्षक त्यावेळी बाहेर उभा होता. एटीएममध्ये गेल्यानंतर संबंधित दोघांनी वारंवार वेगवेगळी एटीएम वापरुन पैसे काढण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास आला. संशय वाटल्यामुळे त्याने तातडीने एटीएम केंद्राचे शटर ओढून बाहेरुन बंद केले. तसेच याबाबतची माहिती कराड शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने त्याठिकाणी भेट देऊन एटीएममधील दोन्ही परदेशी नागरीकांना ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी सुरू करण्यात आली. मात्र, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली गेली. प्राथमिक चौकशीनुसार संबंधित दोन्ही नागरीक रोमानिआ देशातील असल्याचे समोर आले आहे. तसेच त्यांच्याकडे सत्तर बनावटी एटीएम कार्ड आढळून आली आहेत. संबंधित कार्ड जप्त करून पोलिसांनी त्यांच्याकडे रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.

    दरम्यान, गत काही महिन्यांपासून कराडसह परिसरातील एटीएम सेंटरमधून पैसे काढणार्‍या नागरीकांची एटीएम कार्ड ‘क्लोन’ करुन अज्ञातांनी पैसे काढल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलीस त्या टोळीचा शोध घेत आहेत. अशातच हे दोन परदेशी नागरीक एटीएममध्ये विविध कार्डद्वारे पैसे काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यांनी एवढी बनावट एटीएम कार्ड कशासाठी बनवली? त्यांनी ती कोठून आणली? तसेच ते कराडात कशासाठी आले होते? याबाबत पोलीस त्यांच्याकडे कसून चौकशी करीत आहेत.