खासदार उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंहराजे यांना ‘सुरूची’वर गाठले; पुष्पगुच्छ देऊन केले एकमेकांचे अभिनंदन

जिल्हा बँकेच्या (Satara District Bank Election) संचालक पदावर बिनविरोध निवड झाल्यावर खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे (Shivendra Raje Bhosale) यांना बुधवारी दुपारी 'सुरूची' या त्यांच्या निवासस्थानी गाठले. उदयनराजे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे संचालकपदी निवड झाल्याबद्दल विशेष अभिनंदन केले.

    सातारा : जिल्हा बँकेच्या (Satara District Bank Election) संचालक पदावर बिनविरोध निवड झाल्यावर खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे (Shivendra Raje Bhosale) यांना बुधवारी दुपारी ‘सुरूची’ या त्यांच्या निवासस्थानी गाठले. उदयनराजे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे संचालकपदी निवड झाल्याबद्दल विशेष अभिनंदन केले.

    गेल्या महिन्याभरापासून जिल्हा बँक निवडणुकांच्या निमित्ताने खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील आरोप प्रत्यारोपाचा टोकदार संघर्ष सातारा जिल्ह्याने अनुभविला. मात्र, अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी खासदार उदयनराजे यांच्या सर्वसमावेशक पॅनेलमधील सहभागाला रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शिष्टाईनंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी मान्यता दिली. त्यानंतर नाट्यमय घडामोडी झाल्यानंतर दोन्ही राजेंच्या विरोधातील परस्परांनी दिलेल्या उमेदवारांचे अर्ज काढून टाकण्यात आल्याने उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांची जिल्हा बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली. उदयनराजे यांनी या निवडीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला तर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी शिवतीर्थावर येऊन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि ते तडक सुरूचीवर आले.

    दरम्यान, उदयनराजे यांनी वार्तालाप आटोपून थेट सुरूचीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेतली. त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी जिल्हा बँकेवर औद्योगिक व विणकर मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले संचालक अनिल देसाई, ऍड. दत्ता बनकर, सुनील काटकर, फिरोज पठाण, अविनाश कदम यावेळी उपस्थित होते.

    शिवेंद्रसिंहराजे यांच्या दालनात उदयनराजे यांनी त्यांचा पाहुणचार स्वीकाला. उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंहराजे यांना सांगितल्याप्रमाणे गाठत त्यांना दिवाळीचे गिफ्ट दिले. दोन्ही राजांनी राजकीय कटूता बाजूला ठेवत एकमेकांचे खास अभिनंदन केले. यावेळी वेदांतिका राजे भोसले सुद्धा उपस्थित होत्या. दोन्ही राजांची ही सुरूचीवरील भेट ही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.