उंब्रजच्या पुत्र भीम व माता कुंती उत्सवाची सांगता

    कराड : ‘भिमसेन महाराज की जय’ ‘कुंती माता की जय’ या जयघोषात भीम गाडा ओढत उंब्रज, ता .कराड येथील महिनाभर चालणाऱ्या भीम कुंती उत्सवाची भीमसेन मंडळाचे कार्यकर्ते तसेच भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक पद्धतीने कृष्णा नदी पात्रात मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

    यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने उंब्रज ता. कराड येथील भीम कुंती उत्सवाला सुरुवात झाली होती. अनेक वर्षांची ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या या उत्सवाचा श्रावणातील शेवटचा सोमवार हा मुख्य दिवस असतो. सोमवार (दि.६) सप्टेंबर रोजी पुत्र भीम व माता कुंती यांच्या भेटीचा अनोखा सोहळा साध्या पद्धतीने साजरा झाला होता.

    परंपरेनुसार भाद्रपद पोर्णिमेनंतर भीमसेन महाराज व कुंती माता यांच्या विसर्जणाची तयारी सुरू झाली होती. सोमवारी (दि.२०) रात्री भीम मंडपात खिरीच्या प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी (दि. २१) भीम दिल्ली दरवाजात आणण्यात आला. त्यानंतर भाविकांनी नवस बोलण्याचा व बोललेले नवस फेडण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यानंतर भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

    बुधवार (दि.२२) सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास पुत्र भीम व कुंती माता यांची दिल्ली दरवाजात विधीवत पूजन करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. भीमगाडा ओढण्यासाठी भीमसेन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तसेच तरूणांनी सहभाग घेऊन जाणकार मंडळी मार्गदर्शन करताना दिसत होती.

    यावेळी भिमसेन महाराज की जय’ ‘कुंती माता की जय’ या जयघोषात भीम गाडा ओढत कृष्णा नदीपात्राकडे भीम-कुंती विसर्जनासाठी नेत असताना जागोजागी महिलांनी आरती ओवाळून मनोभावे दर्शन घेऊन पेढे यासह नैवेद्य दाखवून प्रसादाचे वाटप केले. भीम गाडा नदीकाठी विसावल्यानंतर विधीवत पूजन आरती करून नवस बोलण्याचा व फेडण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर पुत्र भीम व माता कुंती यांच्या मूर्तींचे विसर्जन कृष्णा नदी पात्रात करण्यात आले.