वडूज नगरपंचायतीत सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती; त्रिशंकू कौल !

नगरपंचायत निवडणूक निकालाचा कौल पुन्हा एकदा त्रिशंकू लागला असून, पुन्हा एकदा चार अपक्षांनी बाजी मारल्याने याही खेपेस नगरपंचायतीचे सुकाणू अपक्षांच्या हाती राहणार आहेत.

    वडूज : येथील नगरपंचायत निवडणूक निकालाचा (Vaduj Nagar Panchayat Result) कौल पुन्हा एकदा त्रिशंकू लागला असून, पुन्हा एकदा चार अपक्षांनी बाजी मारल्याने याही खेपेस नगरपंचायतीचे सुकाणू अपक्षांच्या हाती राहणार आहेत. आज येथील बचत सभागृहात झालेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीनंतर भाजपला सहा, राष्ट्रवादीला पाच, काँग्रेसला एक, वंचित बहुजन आघाडीला एक व अपक्ष चार असे बलाबल झाले आहे.

    नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यासाठी एकूण ७२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. भाजपच्या विजयी उमेदवारांत जयवंत माधवराव पाटील (३९२), बनाजी दिनकर पाटोळे (२२२), रेखा अनिल माळी (५२३ ), रेश्मा श्रीकांत बनसोडे (३३८ ), सोमनाथ नारायण जाधव ( ३९९ ) ओंकार दिलीप चव्हाण (२५८ ) यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांमध्ये विद्यमान नगराध्यक्ष सुनिल हिंदुराव गोडसे, (३२३), आरती श्रीकांत काळे ( ३५३ ), रोशना संजय गोडसे ( २०७ मते), स्वप्नाली गणेश गोडसे ( ४८४ ), शोभा तानाजी वायदंडे (२०२ ) यांचा समावेश आहे.

    काँग्रेसचे अभयकुमार विठ्ठलराव देशमुख (१३७) हे एकमेव उमेदवार विजयी झाले आहेत. तर प्रभाग ५ मधून शोभा दीपक बडेकर, (२४८) यांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीने चंचूप्रवेश केला आहे. तर मनिषा रविंद्र काळे (१८९), राधिका गिरीष गोडसे (२९२ ), सचिन तुकाराम माळी ( ४६०) आणि मनोज कुंभार (२५२) या अपक्ष उमेदवारांचा चा विजयी उमेदवारांत समावेश आहे.

    प्रा. बंडा गोडसेंना दिलासा

    राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत माजी जि.प. सदस्य प्रा. बंडा गोडसे यांनी प्रभाग क्रमांक ३ मधील उमेदवारीसाठी भाजपाची जवळीक साधली होती. मात्र त्याठिकाणी त्यांना काहींचा विरोध झाला. त्यामुळे त्यांनी आपल्या सुनबाई राधिका गोडसे यांना अपक्ष मैदानात उतरविले. उचलत्या प्रभागात उमेदवारी घेऊन विजयी झालेने एका विशिष्ट टप्प्यावर प्रा. गोडसेंना दिलासा मिळाल्याची चर्चा आहे.

    सचिन माळी ठरले बाजीगर

    प्रभाग १७ मध्ये माजी नगराध्यक्षा शोभा माळी यांचे पती सचिन माळी यांना “ओपन” च्या मुद्द्यावर शहरासह खटाव माण तालुक्यातील अनेक मातब्बरांनी टार्गेट केले होते. मात्र, ५ वर्षात केलेली विकासकामे व सातत्याचा जनसंपर्क या बळावर उचलत्या प्रभागात बहुमताने शानदार विजय संपादन करत आपणच बाजीगर आहोत हे अनेकांना दाखवून दिले आहे.

    काँग्रेसचे कॅम्पेनिंग चांगले

    निवडणूक प्रचारात राष्ट्रीय काँग्रेसने राष्ट्रवादीबरोबर युतीचा प्रस्ताव धुडकावत स्वबळाचा नारा देत प्रभाग ४ चा अपवाद वगळता इतर सर्व १६ प्रभागांत उमेदवार उभे करून प्रचाराचे कॅम्पेनिंग चांगले केले. मात्र, या पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. तर ऐनवेळी स्वबळावर तयारी करून कमी जागा लढवून राष्ट्रवादीने चांगले यश मिळविले आहे.

    विद्यमान नगरसेवकांसह प्रमुखांना पराभवाचा धक्का

    निवडणुकीत विद्यमान नगरसेविका डॉ. निता गोडसे, मंगल काळे, शहाजी गोडसे, वचन शहा, नगरसेवक प्रदिप खुडे यांच्या पत्नी रोहिणी खुडे, निलेश गोडसे यांच्या पत्नी मेघा गोडसे, नगरसेविका सुषमा बोडरे यांचे पती दिपक बोडरे, माजी पंचायत समिती सदस्या सौ. रंजना हणमंत खुडे, राजहंस नंदकुमार गोडसे, सुनिता अर्जुन गोडसे, स्मिता सोमनाथ येवले, कल्पना
    गडांकुश आदींना मतदारांनी पराभवाची धूळ चारली.