बोंडारवाडी धरणासाठी ५४ गावातील ग्रामस्थ हुतात्मा भगतसिंग यांच्या स्मृतीदिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने धडकणार ..

कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील ५४ गावांसाठी शेती व पिण्याच्या पाण्यासाठी बोंडारवाडी धरण बांधण्याविषयी २३ मार्चला हुतात्मा भगतसिंग यांच्या स्मृतीदिनादिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा व प्रश्न मार्गी लागेपर्यंत ठिय्या आंदोलन श्रमिक मुक्ती दलाचे संस्थापक डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.

    केळघर : कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील ५४ गावांसाठी शेती व पिण्याच्या पाण्यासाठी बोंडारवाडी धरण बांधण्याविषयी २३ मार्चला हुतात्मा भगतसिंग यांच्या स्मृतीदिनादिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा व प्रश्न मार्गी लागेपर्यंत ठिय्या आंदोलन श्रमिक मुक्ती दलाचे संस्थापक डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. या मोर्चासाठी ५४ गावांतील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बोंडारवाडी धरण कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी यांनी केले आहे.
    बुधवारी दि.२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने नागरिक मोर्च्यांने येणार आहेत. यामध्ये काही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर याच ठिकाणी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्याचा जनतेने घेतलेला निर्णय घेतल्याचे डॉ. पाटणकर यांनी सांगितले. या मोर्चासाठी ५४ गावांतून जनजागृती करण्यात येत असून गावोगावी ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने या मोर्चासाठी देणगी देत असून या मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास विजयराव मोकाशी यांनी व्यक्त केला आहे.
    २५ नोव्हेंबर २०२१ ला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सातारा येथे बैठक झाली होती. तसेच ३ जानेवारी २०२२ व १४ फेब्रुवारी २०२२ ला श्रमिक मुक्ती दल व कृती समितीने स्मरण पत्र दिले होते.

    वरील विषयासंदर्भात २५ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील ५४ गावांना कण्हेर धरणाच्या सहा टक्के राखीव पाण्यातून बोंडारवाडी गावाजवळ शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचे धरण बांधण्याच्या मागणीचा विचार करून पुढील कारवाईचे निर्देश आपण दिले होते. त्यानंतर ३ जानेवारीला श्रमिक मुक्ती दल व कृती समितीने जलसंपदा विभागाच्या अहवालाबाबत आवश्यक कागदपत्रांसह निवेदन दाखल केलेले होते. त्यानंतर आज २ महिन्यांचा कालावधी उलटूनही बोंडारवाडी धरणाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठविण्यात आलेला नाही. त्यामुळे या ५४ गावातील जनतेमध्ये मोठया प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे ५४ गावची जनता २३ मार्च बुधवारी हुतात्मा दिना दिवशी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

    या दिवशी जर काही सकारात्मक निर्णय झाला नाही तर, शेतीसाठी पाणी मिळणे हा ५४ गावच्या जनतेचा हक्क असून तो मिळेपर्यंत ही जनता जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या देण्याचा या जनतेने निर्धार केला आहे.जिल्हाधिकारी यांनी या जनतेच्या मागणीप्रमाणे बोंडारवाडी धरणाबाबत शासनाकडे अहवाल पाठवावा आणि आवश्यक असणारी मंजुरी घ्यावी अशी मागणी ५४ गावांच्या वतीने श्रमिक मुक्ती दल व कृती समितीने केली आहे.