वावरहिरेच्या आजी-माजी सरपंचांकडून कोरोना नियमावलीचे सर्रास उल्लंघन

  वावरहिरे : माण तालुक्यातील वावरहिरे गाव सध्या कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत आघाडीवर आहे. दिवसेंदिवस या प्रमाणात वाढ होत आहे. गावात कोरोनाची स्थिती भयानक आहे. सामान्य नागरिकांत याबाबत भीतीदायक वातावरण आहे. गावातील कोरोनाबाधित असलेलं रुग्ण आपल्या गावचं आरोग्य अबाधित राखण्यासाठी गावात सुरु असलेल्या संस्थात्मक विलिनीकरण कक्षात दाखल झाले आहेत. गावातील सामान्य नागरिक शासनाच्या नियमांची कोटेकोरपणे अंमलबजावणी करत आहेत. परंतु गावाच्या आजी-माजी सरपंच यांच्याकडूनच कोरोनाला वाढीला खतपाणी घालत आहेत. कुंपणच शेत खात असल्याबाबत निदर्शनास येत आहे. याच जबाबदार पदाधिकार्‍यांकडून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत या आदेशाला हरताळ फासला जात आहे.

  संपूर्ण जिल्हात कोरोना हाॅटस्पाॅट ठरलेल्या गावात कोरोनाबाधित रुग्णांसाठी जिल्हाधिकारी यांनी गृह विलीनीकरण बंद करुन संस्थात्मक विलीनीकरणाचा सक्त आदेश जारी केला आहे. अनेक गावात या आदेशाचं नियमित आणि तंतोतंत पालन केले गेले. त्यामुळे तेथील कोरोनाची स्थिती आटोक्यात येण्यास मदत होऊ लागली. अनेक गावे कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करु लागली आहेत. संपूर्ण जिल्ह्याची स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. जिल्हा पूर्णता शिथिल होऊ लागला. पण वावरहिरे येथील परिस्थिती जैसे-थेच राहिली. कारण गावात सामान्य जनतेला वेगळा न्याय अन् गावच्या पुढार्‍यांना वेगळा न्याय.

  सामान्याच्या घरात एखादा कोरोनाबाधित सापडला तर सर्व कोरोना संसर्ग नियंत्रक ग्रामयंञणा त्यांच्यामागे विलगीकरणासाठी धाऊन जाते. अन् तेच जर गावच्या पुढार्‍याच्या बाबतीत घडत असेल तर येथील यञंणा मूग गिळून गप्प बसते. गावची स्थिती अशीच राहिली तर गावच्या कोरोना मुक्तीच्या वल्गना निरर्थक ठरतील. अन् गाव नक्कीच कोरोनाचा महास्फोट ठरेल. यासाठी संबंधित पदाधिकार्‍यांनी गावच्या हितासाठी आपल्या आंधळ्या प्रेमाला आवर घातली पाहिजे.

  गावाला वेगळा न न्याय अन् आपल्या कुटुंबाला वेगळा न्याय असं होता कामा नये. शासनाच्या नियमांची अंमलबजावणी स्वतःपासुनच केली पाहिजे अन्यथा आपल्या चूकांची शिक्षा संपूर्ण गावाला भोगावी लागेल.

  आरोग्य विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष

  ग्राम समिती, दक्षता समिती, आरोग्य विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. ग्रामीण भागात शासनाच्या निर्बंधाच काटेकोर पालन होत नसल्याने गावगाड्यात कोरोनाच्या विळखा अधिच वेगाने वाढत असल्याचे पहायला मिळते. कोरोनाची स्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येकांची जबाबदारी महत्वपूर्ण ठरते. परंतु गावच्या विद्यमान आजी-माजी सरपंच यांच्याकडून नियम डावलले जातात. ग्रामसमिती, दक्षता समिती, आरोग्य विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे सामान्यांना वेगळा अन् पुढार्‍यांना वेगळा न्याय का? अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून ग्राम प्रशासनाविरोधी होऊ लागला.